
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कागल : पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कागल नगरपरिषदेला राज्यस्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. राज्य शासनाच्या “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात कागल नगरपरिषदेचा गौरव करण्यात आला. हा भव्य सोहळा NSCI Dome येथील Sardar Vallabhbhai Patel Stadium येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास आचार्य देवव्रत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कागल नगरपरिषदेच्या प्रतिनिधींनी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि सुमारे तीन कोटी रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारला.
यावेळी कागल नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सौ. सविता माने, उपनगराध्यक्ष श्री. जयवंत रावण, आरोग्य सभापती श्री. प्रवीण काळभर, मुख्याधिकारी श्री. अजय पाटणकर, नगरसेविका सौ. सारिका बारड व सौ. पूनम मोरे, आरोग्य अधिकारी श्री. नितीन कांबळे, शहर समन्वयक श्री. आशिष शिंगण, स्वच्छता मुकादम श्री. बादल कांबळे तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाच्या सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल नगरपरिषदेने पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे राज्य पातळीवर कागलचे नाव उज्ज्वल झाले आहे.
“माझी वसुंधरा” अभियानांतर्गत जैविक व नैसर्गिक शेतीचा प्रसार, कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, हरित अर्थव्यवस्था आणि जनसहभाग वाढविणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. या कार्यक्रमात अभियानावरील माहितीपट सादर करण्यात आला तसेच पर्यावरण विषयक विविध प्रकाशनांचे अनावरणही करण्यात आले.
यापुढील काळात पर्यावरण संवर्धनासाठी अधिक प्रभावी आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम राबविण्याचा संकल्प कागल नगरपरिषदेने व्यक्त केला आहे. या यशाबद्दल नगराध्यक्षा सौ. सविता माने यांनी सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

