
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोतोली (ता. पन्हाळा) : आध्यात्मिक वातावरणात भक्तिरसाची उधळण करणारा भव्य ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा कोतोली येथे उत्साहात संपन्न होणार आहे. बुधवार दिनांक ४ मार्च २०२६ ते मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ या कालावधीत श्री हनुमान देवालयासमोर हा सप्ताह सोहळा भक्तिभावात पार पडणार आहे.
संत परंपरेचा गौरवशाली वारसा जपत संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवानिमित्त तसेच संत एकनाथ महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रसाद व विश्रांती, सायंकाळी भजन, प्रवचन, कीर्तन आणि हरिजागर अशा विविध भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

सप्ताहादरम्यान ह.भ.प. अशोक शेळार (वाघवे), ह.भ.प. परशुराम पोहाळकर (दिगवडे), ह.भ.प. पांडुरंग गांजवे (कोतोली), ह.भ.प. दिनकर पाटील (केळी), ह.भ.प. प्रा. ब. ना. तुरंबेकर (कोतोली), ह.भ.प. मारुती जाधव (तिरपण) आदी मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकार यांची उपस्थिती लाभणार आहे.
१० मार्च रोजी सकाळी पारायण समाप्ती, काल्याचे भजन, दिंडी सोहळा व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
या आध्यात्मिक पर्वामुळे कोतोली परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून ग्रामस्थ, वारकरी संप्रदायाचे भाविक आणि पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
“जय जय राम कृष्ण हरी” च्या अखंड गजरात रंगणारा हा सप्ताह सोहळा कोतोलीच्या धार्मिक परंपरेत भर घालणारा ठरणार आहे. ग्रामस्थांनी उपस्थित राहून या भक्तिसोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

