
कोतोली प्रतिनिधी -पांडुरंग फिरिंगे
पृथ्वीवर सुमारे ७१ टक्के पाणी आणि केवळ २९ टक्के जमीन आहे. या मर्यादित जमिनीपैकी नगण्य हिस्सा शेतीसाठी वापरात असून, रस्ते, प्लॉटिंग आणि घरबांधणीसाठी शेतीजमीन झपाट्याने कमी होत आहे. त्यातच रासायनिक खतांचा अतिरेक मातीचे आरोग्य घालवत असल्याने नैसर्गिक शेती धोक्यात आली आहे, असा इशारा सेंद्रिय शेतीतज्ज्ञ युवराज कामत यांनी दिला.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दिगवडे (ता. पन्हाळा) येथे आयोजित निवासी सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात ‘सेंद्रिय शेती’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
“गांडूळ हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. मात्र रासायनिक औषधांच्या अति वापरामुळे तो शेतातून गायब झाला आहे. परिणामी जैविक घटक नष्ट होत असून सेंद्रिय शेती संकटात सापडली आहे,” असे सांगून त्यांनी शेणखत, जीवामृत यांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. जीवामृतामुळे मातीतील जैविक घटक टिकून राहतात, मातीची सुपीकता वाढते आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दर तीन वर्षांनी माती परीक्षण करणे अनिवार्य असून उसाची जात निवडताना ८६०३२ व १५०१२ या जातींचा विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. चांगल्या शेतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगवडे येथील प्रगतशील शेतकरी सचिन कुलकर्णी होते. प्रमुख उपस्थितीत सदाशिव खाडे, शिवाजी पाटील, बाजीराव पाटील, रणजित पाटील, प्रशांत काळे, सागर खाडे, प्रदीप पाटील, वाय. के. पाटील, एस. एम. पाटील, संग्राम पाटील, दीपक काळे, अरविंद वजार्डे, संभाजी वजार्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद गोसावी यांनी केले. बबनराव चौगुले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन स्नेहल कांबळे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. पी. डी. माने, प्रा. जगदीश सरदेसाई, प्रा. हरिश्चंद्र शिरसट, सर्व स्वयंसेवक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या दिगवडे (ता. पन्हाळा) येथील श्रमसंस्कार शिबिरात सेंद्रिय शेती विषयावर मार्गदर्शन करताना युवराज कामत. समवेत सचिन कुलकर्णी व उपस्थित मान्यवर.

