
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबीया (NMEO–OS) सन 2025-26 अंतर्गत देशातील तेलबियांवरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच तेलबियांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी शासनामार्फत विविध प्रोत्साहनपर योजना राबविल्या जात आहेत. सन 2025-26 मधील उन्हाळी हंगामासाठी भुईमूग पिकाकरिता जिल्ह्यासाठी प्रमाणित बियाणे वितरणाकरिता 750 क्विंटल व पिक प्रात्यक्षिक करिता 290 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भूईमूग पिकासाठी 100 टक्के अनुदानावर कृषी विभागाकडून प्रमाणित बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत असून शेतकऱ्यांनी बियाण्याकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in/,https://farmeragrilogin.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत व महाविस्तार AI ॲपचा वापर करावा.
या अनुषंगाने शासनमान्य बियाणे वितरण केंद्रांमार्फत उन्हाळी भूईमूग पिकासाठी हेक्टरी 150 किलो (दर रु. 114/किलो) प्रमाणे प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिकासाठी हेक्टरी 100 किलो बियाणे वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व शेतकरी गटांनी याचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी/ कृषी विभाग यांच्याकडे संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बियाण्यांचे वितरण कार्यरत राहील.
अर्ज करताना 7/12, आधारक्रमांक, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे आवश्यक आहेत. बियाणे वितरण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या प्रमाणानुसार योग्य त्या प्रमाणातच बियाण्यांची निवड करावी. बियाणे वितरण केलेले शेतकऱ्यांनी भुईमूग लागवड करणे बंधनकारक असून त्याची नोंद कृषी मॅपर या ॲपवरती नोंदवली जाणार असल्याने प्राप्त बियाणे शास्त्रयुक्त पध्दतीने पेरणे गरजेचे आहे.
पात्र शेतकऱ्यांनी व शेतकरी गटांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

