
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : ज्या स्कुल बस, स्कुल व्हॅन, ऑटोरिक्षा यांचे योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आले आहे, अशा वाहनधारकांनी त्यांचे योग्यता प्रमाणपत्र तातडीने नुतणीकरण करुन घ्यावे. विना वैध योग्यता प्रमाणपत्राशिवाय स्कुल बस, स्कुल व्हॅन, ऑटोरिक्षा रस्त्यावर चालताना तपासणीमध्ये आढळून आल्यास मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले.
त्यानुषंगाने सूचना खालीलप्रमाणे –
शाळेतील मुलांची ने-आण करणाऱ्या सर्व बस व इतर वाहने शालेय विद्यार्थ्यांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी शाळेने घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शालेय बस व विद्यार्थ्यांच्या वाहतुकिसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनात CCTV कॅमेरे कार्यरत स्थितीत असणे अनिवार्य आहे. 6 वर्षाखालील मुलांची ने-आण करणाऱ्या शालेय बसमध्ये महिला कर्मचारी नियुक्त करणे बंधनकारक आहे. मुलींची वाहतूक करणाऱ्या शालेय वाहनांमध्ये महिला कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक आहे. शालेय बसचे चालक, कंडक्टर व क्लिनर यांची पोलीस पडताळणी (Police Verification) पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. वाहन चालकांकडे वैध वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे. शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध योग्यता प्रमाणपत्र (Certificate of Fitness) असणे अनिवार्य आहे. वैध योग्यता प्रमाणपत्रांक नसलेल्या कोणत्याही वाहनाचा शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापर करु नये, असे आरटीओकडून सुचित करण्यात आले आहे.

