
कोल्हापूर | प्रतिनिधी– जानवी घोगळे
‘ज्येष्ठांची सेवा हीच ईश्वरसेवा’ या उदात्त ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन गेली १९ वर्षे अखंड सेवाभावाने कार्यरत असलेल्या *माया केअर फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका सौ. मंजिरी अभय जोशी व श्री. अभय जोशी यांनी आज कोल्हापूर येथील संस्थेच्या स्वयंसेवकांची भेट घेतली. देशभरात ७१ केंद्रांच्या माध्यमातून हजारो वृद्धांच्या जीवनात आधार, सन्मान आणि मायेचा स्पर्श पोहोचवणाऱ्या या संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेताना, त्यांनी कोल्हापूरमधील स्वयंसेवकांच्या समर्पित कार्याचे विशेष कौतुक केले.

या भेटीत पुरुष व महिला स्वयंसेवकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती संस्थापकांना दिली. वृद्धांची दैनंदिन काळजी, मानसिक आधार, आरोग्यविषयक मदत तसेच सामाजिक एकटेपणा दूर करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची दखल घेत जोशी दांपत्याने समाधान व्यक्त केले. “स्वयंसेवकांचे निःस्वार्थ योगदान हेच माया केअर फाउंडेशनच्या यशाचे खरे गमक आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान *एस.पी. नाईन मीडियाचे प्रतिनिधी गौरीशंकर संगोळी यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. समाजप्रबोधनपर शॉर्ट फिल्म ‘मृत्युंजयाचे उपासक’ या चित्रपटाला संगीत दिल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक जाणिवा वाढवण्यासाठी अशा आशयघन माध्यमांची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी मांडले.

या प्रसंगी जोशी दांपत्याने सर्व स्वयंसेवकांशी मुक्तपणे संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. भविष्यात माया केअर फाउंडेशनचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात नेण्यासाठी स्वयंसेवकांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी सेवाभाव, करुणा आणि मानवतेचे मूल्य जपण्याचा संदेश दिला.
या प्रेरणादायी कार्यक्रमास संजय कुलकर्णी, विश्वास पांचाळ, अभिषेक यादव, राजेंद्र मकोटे, पोखरणीकर मॅडम, संगीता राठोड, दुर्गा, सतीश साळुंके आदी मान्यवर व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माया केअर फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे सेवाभावी कार्य समाजात माणुसकीची आणि कृतज्ञतेची जाणीव अधिक दृढ करत असून, कोल्हापूरमधील स्वयंसेवकांची ही कार्यतत्परता अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.


