नांदारी रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणा कळसाला; निष्काळजीपणामुळे अपघात, मृत्यू अन् रस्त्यावरच महिलेचा अंत — प्रशासनाची ‘गांधारी’ भूमिका उघड..

0
60

(प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे)

कोतोली फाटा ते नांदारी या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासाठी आमदार विनय कोरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र एवढ्या मोठ्या निधीनंतरही प्रत्यक्षात सुरू असलेले रस्त्याचे काम पाहता, बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा कळस गाठल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

रडत-खडत सुरू असलेले काम; अपघातांचे सत्र

या मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत संथ, निकृष्ट आणि असुरक्षित पद्धतीने सुरू आहे. खोदकामानंतर योग्य भराव नाही, ठिकठिकाणी खड्डे, बाजूला मातीचे ढिग, कोणतेही सुरक्षाफलक किंवा इशारे नसल्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. अनेक नागरिकांना गंभीर दुखापत झाली असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. एवढे होऊनही ठेकेदार व संबंधित बांधकाम विभागाकडून ना खंत, ना सुधारणा—अशी अवस्था आहे.
नणुंद्रेतील गटारी ‘जैसे थे’; दुर्गंधी, रोगराई अन् मृत्यू

रस्त्यालगत नणुंद्रे गावातील गटारी आजही ‘जैसे थे’अवस्थेत आहेत. सांडपाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, रोगराईने डोके वर काढले आहे. या निष्काळजीपणाचा कळस म्हणजे कणेरी येथील एका महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू. हा प्रकार म्हणजे थेट प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे झालेला बळी असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.

लेखी तक्रारी करूनही दुर्लक्ष

या गंभीर समस्यांबाबत ग्रामस्थांनी वारंवार लेखी तक्रारी करूनही संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदाराने गांधारीची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे.
“आम्ही अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, मात्र कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही,” असे रूपाली पाटील यांनी SP-9 MEDIA शी बोलताना स्पष्ट केले.

थेट आरोप — लोकांच्या जीवाशी खेळ

सार्वजनिक निधीचा अपव्यय, नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ, अपघातांना आमंत्रण देणारे रस्ते आणि रोगराईकडे उघड्या डोळ्यांनी दुर्लक्ष—हे प्रकार अत्यंत गंभीर आहेत. संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पन्हाळा पश्चिम भागाकडे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

पन्हाळा पश्चिम भागात संबंधित विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप आहे. परिणामी नणुंद्रे येथील कुटुंबांना रोगराईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत युवा संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तांदळे म्हणाले,
“यापुढे काही अडचण उद्भवल्यास त्याला संबंधित विभाग व ठेकेदार पूर्णतः जबाबदार असतील. नागरिकांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही.”

आंदोलनाचा इशारा

जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर या निष्काळजीपणाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन दोषींवर कठोर कारवाई करणार का, की निष्पाप नागरिकांचे बळी सुरूच राहणार—असा सवाल परिसरात उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here