रत्नागिरीच्या चित्रकार ओंकार भातडे यांची ‘कला-टॉक्स’ मुलाखत मालिकेसाठी निवड ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक..

0
95

रत्नागिरी :
रत्नागिरी शहर परिसरातील कारवांची वाडी येथील तरुण व होतकरू चित्रकार ओंकार भातडे यांची ‘कलारंग’ या डिजिटल व्यासपीठावरील ‘कला-टॉक्स’ या विशेष मुलाखत मालिकेसाठी निवड झाल्याने कला क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने संपादक मेघा कोल्हटकर यांनी ओंकार भातडे यांची समक्ष भेट घेऊन त्यांच्या कलाप्रवासाबाबत मनमोकळा संवाद साधला.

घरी भेट दिल्यानंतर ओंकार भातडे व त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत उत्स्फूर्त आणि आपुलकीचा प्रतिसाद दिला. नोकरी-व्यवसाय करत असतानाही कलेशी असलेली नाळ जपत, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भान ठेवत ओंकारने आपल्या चित्रकलेचा प्रवास सातत्याने पुढे नेला आहे. या प्रवासात आई-वडिलांचा आणि कुटुंबीयांचा मोलाचा पाठिंबा लाभल्यानेच त्याची कला अधिक खुलत गेल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

कोरोना काळातील प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी नैराश्य स्वीकारले असताना, ओंकार भातडे यांनी मात्र कलेतून सकारात्मकतेचा मार्ग शोधला. त्या काळात तो अधिकाधिक चित्रकलेशी जोडला गेला आणि जीवनातील भावभावना, अनुभव व आशा यांना रंगांच्या माध्यमातून व्यक्त करू लागला. त्यामुळेच “नकारात्मकतेच्या काळातही आयुष्याला रंग देणारा कलाकार” अशी ओंकारची ओळख निर्माण झाली आहे.

यावेळी SP-9 मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेची माहिती मेघा कोल्हटकर यांनी उपस्थितांना दिली. ग्रामीण व दुर्लक्षित कलाकारांची कला समाजासमोर आणणे, त्यांच्या संघर्षांना शब्द देणे आणि त्यांना योग्य ओळख मिळवून देणे, हाच ‘कला-टॉक्स’ मालिकेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ओंकार भातडे यांची ‘कला-टॉक्स’ मालिकेसाठी झालेली निवड ही केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाची बाब नसून, रत्नागिरी जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक तरुण कलाकारांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळेल, असा विश्वास कला क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here