
प्रतिनिधी : जानवी घोगळे
देहराडून (उत्तराखंड), दि. 21 फेब्रुवारी 2026 – देशभरात उद्योग, समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणाऱ्या भारत श्री राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2026 या प्रतिष्ठित पुरस्काराने महाराष्ट्रातील उद्योजिका व समाजसेविका सौ. पूनम मोरे तोडकर यांना सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार समारंभ देहराडून येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सुबोध उनियाल यांच्या शुभहस्ते त्यांना “Best Business Woman” आणि “Ideal Social Worker” या त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले. यावेळी सविता कपूर यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
संपूर्ण भारतातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातून उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूनम मोरे तोडकर यांचा राष्ट्रीय स्तरावर विशेष सन्मान झाला. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी त्या महाराष्ट्रातून निवड झालेल्या एकमेव मानकरी ठरल्या.

गेल्या सात वर्षांपासून पूनम मोरे तोडकर उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्य करत आहेत. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या उपक्रमातून महिलांना मशीन आणि कच्चा माल उपलब्ध करून देत त्यांना घरबसल्या उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या माध्यमातून महिलांना दरमहा सुमारे १५ ते २० हजार रुपये उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. आतापर्यंत त्यांनी सुमारे तीन हजार महिलांना रोजगार व स्वावलंबनाची संधी दिली आहे.
उद्योगासोबतच त्या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अन्नधान्य वाटप, अंध व वृद्ध व्यक्तींना मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण अशा विविध उपक्रमांतून त्या समाजसेवा करत आहेत. स्वतःच्या उत्पन्नातील काही भाग त्या नियमितपणे सामाजिक कार्यासाठी खर्च करतात.
त्यांच्या सातत्यपूर्ण समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना प्रदान करण्यात आलेला भारत श्री राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2026 हा त्यांच्या कार्याचा सन्मान मानला जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्रासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

