
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. २३ : २५ जानेवारी या १६ व्या ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या निमित्ताने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गीता गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नायब तहसीलदार जयंत गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर दृढ निष्ठा ठेवून, अशी प्रतिज्ञा घेतो की, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू. मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकांचा गौरव कायम राखू. तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे मतदान करू. धर्म, वंश, जात, पंथ, भाषा किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची आम्ही दृढ प्रतिज्ञा करीत आहोत,” अशा आशयाची शपथ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत उपस्थितांनी घेतली.राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून रविवारी, २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराबाई सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.


