घोडावत इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक–पालक मेळावा उत्साहात

0
17

प्रतिनिधी : जानवी घोगळे

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात आयोजित शिक्षक–पालक मेळावा उत्साही वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा या उद्देशाने आयोजित या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले उपस्थित होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे संचालक *डॉ. विराट गिरी, पॉलिटेक्निक विभागाचे विभागप्रमुख, कार्यक्रम समन्वयक *प्रा. काजल बोहरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण यांनी केले.

मार्गदर्शन करताना विनायक भोसले यांनी शिक्षक व पालकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर सखोल प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी मुलांना वेळ देणे, योग्य संस्कार करणे आणि त्यांच्या भावनिक गरजा समजून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर, मोबाईल व इंटरनेटचा सुयोग्य वापर आणि भविष्यातील करिअर संधींबाबत त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकांनी मनोगते व्यक्त करत महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण व विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.

संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी शैक्षणिक आढावा सादर करत विद्यार्थ्यांच्या जीवनातील पालकांचे महत्त्व आणि शिक्षक–पालक यांची संयुक्त जबाबदारी अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री भालकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. काजल बोहरा यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here