
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
देशाच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे व लोकशाही मूल्यांचे प्रतीक असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शाळा विद्या मंदिर, वाघवे येथे उत्साहपूर्ण वातावरणात तयारी सुरू आहे. शाळेच्या आवारात देशभक्तीपर सजावट, सराव व विविध उपक्रमांमुळे चैतन्य निर्माण झाले आहे. :
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. आनंदा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकवर्ग विशेष परिश्रम घेत आहे. विद्यार्थ्यांना देशभक्तीचे महत्त्व पटवून देत त्यांच्यात राष्ट्रप्रेम, शिस्त व जबाबदारीची भावना रुजविण्यावर भर देण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या तयारीत किशोरी चौगुले, संगीता अनुशे, प्रतीक्षा बुवा या शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले आहे. ध्वजारोहण समारंभ, देशभक्तीपर गीत, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सराव उत्साहात सुरू आहेत.“विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण होणे हेच आमचे खरे यश आहे,” असे मत मुख्याध्यापक आनंदा सुतार यांनी व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत होणारा हा कार्यक्रम ग्रामस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणार असून, लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची बीजे रोवण्याचे कार्य केंद्र शाळा विद्या मंदिर, वाघवे करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

