कै. आक्काताई पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीर

0
204

मायेच्या आठवणींना आरोग्यसेवेची मानवंदना – शेकडो रुग्णांना दिलासा

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी आणि मायेच्या नात्यांची आठवण जपत आयोजित केलेले कै. आक्काताई पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीर म्हणजे मानवतेचा जिवंत साक्षात्कार ठरला. आपली लाडकी बहिण समाजासाठी नेहमीच तत्पर असायची, तिच्याच आठवणींना जपताना कोतोली येथील सामाजिक कार्यकर्ते बबन कांबळे यांनी हे शिबीर आयोजित केले. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारी भावना आणि कृतीतून दिसणारी समाजनिष्ठा प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेली.

या शिबिरात ग्रामीण भागातील शेकडो गरजू रुग्णांनी सहभाग घेतला. रेणुका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले व्यस्त वेळापत्रक बाजूला ठेवत निस्वार्थीपणे सेवा दिली. डॉ. अनिल पाटील, डॉ. खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांसह डॉ. प्रविण घुगरे, डॉ. सचिन पाटील, डॉ. सुभाष चौगुले यांनी रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करून योग्य मार्गदर्शन व उपचार केले. औषधोपचारासोबतच दिलेला मायेचा शब्द अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य फुलवणारा ठरला.

या उपक्रमास ग्रामपंचायत सदस्या लता माने यांच्यासह अजित कांबळे, गणेश पाटील, महादेव पाटील, बाबासाहेब रेडेकर, बाजीराव आंगटेकर, प्रकाश कांबळे, संजिवनी कांबळे, रणजित चौगुले, कृष्णात पाटील, विठ्ठल पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून या उपक्रमाला सामाजिक बळ दिले.

कार्यक्रमात सागर वर्पे व प्रकाश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना, “आठवणी जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजासाठी काहीतरी करून दाखवणे,” असे भावनिक शब्द उच्चारले. त्यांच्या बोलण्यातून सामाजिक बांधिलकीची तीव्र जाणीव व्यक्त झाली.

हे शिबीर केवळ वैद्यकीय तपासणीपुरते मर्यादित न राहता, कै. आक्काताई पांडुरंग जाधव यांच्या संस्कारांची आणि माणुसकीची उज्ज्वल आठवण बनले. गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसताना, आजारग्रस्तांना दिलासा देताना, या उपक्रमाने ग्रामीण आरोग्यसेवेला नवी दिशा दिली.
ग्रामस्थांनी आयोजक व डॉक्टरांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करत, “ही केवळ सेवा नाही, ही श्रद्धांजली आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here