२६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘सावित्री कलयुगातली’ प्रदर्शित

0
61

प्रतिनिधी | मुंबई

मराठी सिनेविश्वात सामाजिक बांधिलकी जपणारा भावनात्मक सिनेमा म्हणून ‘सावित्री कलयुगातली’ हा मराठी चित्रपट येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध आणि मूल्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा होणाऱ्या वटसावित्री सणाच्या पार्श्वभूमीवर पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास, समर्पण आणि संघर्ष या भावनांचा वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे. आज स्त्रिया कितीही आधुनिक झाल्या तरी वटसावित्री पूजेचे महत्त्व टिकून आहे. पतीच्या संकटसमयी सावित्रीसारखी ठामपणे उभी राहणारी पत्नी आणि मुलावर संकट आल्यास त्याच्या पाठीशी उभे राहणारे आई-वडील—अशा नात्यांचा भावनिक प्रवास या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. आई-वडिलांच्या अति लाडामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न आणि वाढत्या घटस्फोटांचे वास्तव यावरही चित्रपटातून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जय मल्हार एंटरटेनमेंट वर्ल्ड आणि एसपी एंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत हा पहिला मराठी चित्रपट असून निर्माता म्हणून खानदेश सुपुत्र कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव (निजामपूर, धुळे) यांनी पुढाकार घेतला आहे. सहनिर्माती धनश्री बच्छाव, सहनिर्माता रवी कुमार आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्यारेलाल शर्मा यांनी सांभाळली आहे.

चित्रपटात पवन चौरे आणि महेक शेख मुख्य भूमिकेत दिसणार असून, नकारात्मक भूमिकेत *जयराज नायर, तर खलनायकाच्या भूमिकेत *नानासाहेब बच्छाव यांनी काम केले आहे. अभिनेत्री *श्वेता भामरे, तसेच *निशान पवार, रवी कुमार, जी. एस. पाटील, राकेश शिर्के, डॉ. अविनाश पाटील, किरण ब्राम्हणे आणि बालकलाकार नमो यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संवाद लेखन सुजाता पवार आणि राकेश शिर्के यांचे आहे.

अभिनेत्री श्वेता भामरे म्हणाल्या, “या चित्रपटात लीड रोल करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद आहे. आयुष्यात बरेच काही शिकवणारा आणि आदर्श घेण्यासारखा हा चित्रपट आहे. कथा प्रभावी असून गाणीही मनाला वेड लावणारी आहेत. प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन जरूर पाहावा.”

या चित्रपटाचे ट्रेलर आणि पोस्टर राज्यवन मंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. त्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा यांनी या प्रकल्पासाठी घेतलेल्या मेहनतीचेही त्यांनी कौतुक केले. मीडिया पार्टनर सुनील भोसले यांनी चित्रपटाच्या प्रचार-प्रसारासाठी निस्वार्थीपणे योगदान दिले आहे.

कुटुंब, नाती आणि मूल्यांचा सखोल विचार मांडणारा ‘सावित्री कलयुगातली’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here