
प्रतिनिधी :जानवी घोगळे
आळवे : शिवगर्जना फौंडेशनच्या वतीने काल आयोजित करण्यात आलेल्या स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धेत आळवे शाळेची विद्यार्थिनी कु. सुमेधा केशव मगर हिने उत्कृष्ट सादरीकरण करत दुसरा क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सामाजिक विषय, देशभक्ती, संस्कार, निसर्ग व जीवनमूल्ये यावर आधारित स्वरचित कवितांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. कु. सुमेधा हिने आपल्या भावपूर्ण मांडणीने, स्पष्ट उच्चार आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने परीक्षक व उपस्थितांची मने जिंकली.
या यशामागे आळवे शाळेचे शिक्षक श्री. लठ्ठे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देत साहित्यिक अभिव्यक्ती घडवून आणण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
कु. सुमेधा हिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, सहाध्यायी तसेच पालकांनी अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे आळवे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत मानाचा शिरपेच जोडला गेला आहे.

