“विद्यार्थ्यांनी डिजिटल युगात आर्थिक शिस्त आत्मसात करणे काळाची गरज” – डॉ. व्ही. बी. ककडे

0
12

विवेकानंद कॉलेज येथे ‘डिजिटल आर्थिक साक्षरता’ कार्यशाळा उत्साहात संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी
डिजिटल व्यवहारांची वाढती व्याप्ती आणि आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त, नियोजन आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. व्ही. बी. ककडे यांनी केले. ते विवेकानंद महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित ‘डिजिटल आर्थिक साक्षरता’ या एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यशाळेत तीन सत्रांद्वारे तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
आर्थिक साक्षरतेवर भर
पहिल्या सत्रात डॉ. ककडे यांनी Financial Literacy & Awareness या विषयावर मार्गदर्शन करताना उत्पन्न-खर्चाचे योग्य नियोजन, महागाईचा परिणाम, SMART आर्थिक ध्येय निश्चिती, चक्रवाढ व्याजाची ताकद (Rule of 72), टर्म व हेल्थ इन्शुरन्सची गरज आणि आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच Ponzi Scheme आणि विविध आर्थिक फसवणुकांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.सायबर गुन्ह्यांपासून सजगतेचा संदेश
दुसऱ्या सत्रात सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर येथील श्री. सुकुमार जाधव यांनी डिजिटल युगातील सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय स्पष्ट केले. Phishing, सोशल इंजिनिअरिंग, ऑनलाइन गेमिंग, रोजगार व विवाह फसवणूक यांची उदाहरणे देत त्यांनी मोबाईल सुरक्षिततेसाठी अज्ञात कॉल सायलेंट ठेवणे, फ्री Wi-Fi टाळणे, अँटीव्हायरस वापरणे यांसारख्या उपायांची माहिती दिली. कोणतीही फसवणूक झाल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असे त्यांनी सांगितले.
सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांचे मार्गदर्शन
तिसऱ्या सत्रात डॉ. के. व्ही. मारूळकर, सहयोगी प्राध्यापक, शिवाजी युनिव्हर्सिटी यांनी ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. पासवर्ड गोपनीय ठेवणे, https असलेल्या सुरक्षित संकेतस्थळांचा वापर, ऑपरेटिंग सिस्टीम अद्ययावत ठेवणे आणि महत्त्वाच्या अॅप्सना लॉक ठेवणे यांसारख्या सूचना त्यांनी दिल्या. डिजिटल नवकल्पनांचा जबाबदारीने आणि सुरक्षिततेने वापर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थना व रोपांना पाणी घालून करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत प्रा. सनी काळे यांनी केले, तर आभार डॉ. अमोल मोहिते यांनी मानले.
या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालय (न्यू कॉलेज क्लस्टर) अंतर्गत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ. उमेश दबडे, डॉ. योगेश माने, प्रा. सतिश चव्हाण, प्रा. ओंकार कुलकर्णी तसेच रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here