पाचगाव ग्रामपंचायतीचा आक्रमक पवित्रा अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला कसलीही सवलत नको – उदाहरणार्थ शिक्षा द्यावी

0
269

पाचगाव प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे

अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारप्रकरणाने संपूर्ण समाज हादरून गेला असून, या प्रकरणातील आरोपीविरोधात चार्जशीट तयार करताना कोणत्याही प्रकारची कायदेशीर मुभा, सवलत किंवा दिरंगाई अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम व कठोर मागणी पाचगाव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. समाजात पुन्हा असे घृणास्पद कृत्य करण्याचे धाडस कुणालाही होऊ नये, यासाठी निर्दय, वेगवान आणि उदाहरणार्थ कारवाई झालीच पाहिजे, असा स्पष्ट इशारा देत ग्रामपंचायतीने करवीरचे उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांना सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात ग्रामपंचायतीने ठाम शब्दांत नमूद केले की, बालिकांवरील अत्याचार हा समाजावरील कलंक असून अशा गुन्ह्यांबाबत ‘शून्य सहनशीलता’ हीच भूमिका प्रशासनाने घ्यावी. तपासात कोणताही दबाव, तडजोड, राजकीय हस्तक्षेप किंवा आरोपीला फायदा पोहोचेल अशी कृती झाल्यास ग्रामस्थ शांत बसणार नाहीत. चार्जशीट काटेकोर, पुराव्यांवर आधारित व कायद्याच्या कठोर तरतुदींनुसार दाखल करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, पीडित बालिकेला व तिच्या कुटुंबाला पूर्ण न्याय, संरक्षण आणि मानसिक आधार देण्यात यावा; प्रकरणाची सुनावणी फास्ट-ट्रॅक पद्धतीने व्हावी; आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय तात्काळ राबवावेत, असेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले.

या वेळी सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच दीपाली गाडगीळ यांच्यासह सदस्य संजय शिंदे, रोमा नलवडे, अभिजित पौंडकर, संग्राम पाटील, नारायण गाडगीळ, शिवाजी ढेरे, चंद्रकांत सस्ते, वंदना साळुंखे, मनीषा हासबे आदी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने “गुन्हेगारांना संरक्षण नाही, तर कठोर शिक्षा हाच न्याय” अशी भूमिका मांडत प्रशासनाने तत्काळ प्रभावी पावले उचलावीत, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, असा ठोस इशाराही दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here