
मुंबई : येथील आगामी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक २१२ (भायखळा) मधून सौ. गीता अजय गवळी यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अखिल भारतीय सेनेचे माजी आमदार तथा संघटनेचे प्रमुख श्री. अरुणभाई गवळी ऊर्फ *डॅडी* तसेच पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस सौ. आशा अरुण गवळी ऊर्फ *मम्मी* यांची प्रमुख उपस्थिती लाभली.उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भायखळा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सौ. गीता गवळी यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला व युवक सक्षमीकरण आदी विषयांवर ठोस काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी बोलताना माजी आमदार श्री. अरुणभाई गवळी यांनी सांगितले की, भायखळा हा परिसर मेहनती आणि प्रामाणिक नागरिकांचा आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणारे नेतृत्व देणे ही काळाची गरज आहे. सौ. गीता गवळी या लोकांच्या कामासाठी नेहमीच तत्पर असून, त्यांच्या माध्यमातून वॉर्डचा विकास नक्कीच साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय सरचिटणीस सौ. आशा अरुण गवळी यांनीही मार्गदर्शन करताना महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवणे गरजेचे असल्याचे नमूद केले. लोकप्रतिनिधी म्हणून महिलांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली तर समाजात सकारात्मक बदल घडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सौ. गीता गवळी यांनी जनतेच्या आशीर्वादाने निश्चितच विजय मिळवून भायखळा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे व विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले.

