कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला संधी; मात्र, पक्ष विस्ताराचे आव्हान

0
79

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

विश्वास पाटीलकोल्हापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवस काढलेल्या जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. 

 काँग्रेसचा पारंपरिक जनाधार पुन्हा त्या पक्षाकडे आशेने पाहत असल्याचे चित्र दिसते.

परंतु तेवढ्यावर समाधान मानण्यासारखी स्थिती नाही. इचलकरंजी शहरासह कागल, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा तालुक्यात पक्षाची बांधणी करण्याची गरज आहे.

आतापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात नेत्यांना सांभाळण्यात पक्षांची वाताहत झाल्याचा अनुभव दोन्ही काँग्रेसला आला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची विधान परिषद, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि गोकूळ दूध संघात मदत होते म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीनेही शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील पक्षाची संघटना वाऱ्यावर सोडल्याचा अनुभव आहे.

त्यामुळे या तालुक्यांमध्ये नवे नेतृत्व उभे राहू दिले नाही. पक्षाची शाखा स्थापन करायची असते हेच हा पक्ष विसरून गेल्याची स्थिती आहे. आता आमदार सतेज पाटील रस्त्यावर उतरून सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत. परंतु त्यांना पक्ष वाढवायचा असेल तर काही ऑपरेशन्स ही करावीच लागतील.

पन्हाळ्यात तब्बल २२ वर्षे यशवंत एकनाथ पाटील यांच्यासारख्या जिगरबाज नेत्याने हा मतदारसंघ सांभाळला. तिथे आज पक्षाचे काम कोण करते हेच सांगता येत नाही. त्यांचा मुलगा अमर पाटील हा गोकूळचा संचालक आहे.

परंतु स्थानिक राजकारणात त्यांची कोरे यांच्याशी आघाडी आहे. डॉ. जयंत पाटील यांच्याकडे वारसा, शिक्षण, वय, संस्थात्मक बळ असूनही ते पण आघाडीत रमले आहेत.

हीच स्थिती शाहूवाडीत आहे. तिथे कर्णसिंह गायकवाड हे सध्या काँग्रेसचे नेते म्हणून काम करतात. परंतु स्थानिक राजकारणात त्यांची कोरे यांच्याशी आघाडी आहे. विधानसभेला ते कोणती भूमिका घेणार, हे सांगता येत नाही.

शाहूवाडीत दोन्ही गायकवाड मूळ काँग्रेसच्या झेंड्याखाली एक झाले तर सगळ्यांना त्यांच्यामागे धावावे लागेल; परंतु तसे घडत नाही. परंतु तसे न करता नेत्यांच्या मागे राहून पदे मिळवण्यात धन्यता मानल्याने पक्षाची वाताहत झाली आहे.

कागलच्या गटातटाच्या राजकारणात नेतृत्वच न मिळाल्याने कागलमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच नाही. एकटे वंदूरचे शिवाजी कांबळे हे तालुकाध्यक्ष सोडले तर तिथे एक कार्यकर्ता पक्षाला उभा करता आलेला नाही.

आजरा तालुक्यात ज्यांना काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले ते उमेश आपटे सध्या पक्षापासून बाजूला गेले आहेत. हा सुद्धा मुश्रीफ संगतीचाच परिणाम आहे. तिथे नामदेव नार्वेकर यांनी राजीनामा दिल्यापासून तालुकाध्यक्ष नाही.

आता अभिषेक शिंपी सक्रिय झाले आहेत. परंतु ते काँग्रेस म्हणून पुढच्या राजकारणात किती एकनिष्ठ राहतात, याचीच उत्सुकता असेल. गडहिंग्लजला विद्याधर गुरबे, किसन व सुरेश कुराडे हे बंधू आणि संग्राम नलवडे हे पक्षासोबत आहेत.

गुरबे यांनी संघटनात्मक बांधणी केली आहे. कुराडे यांची ओळख काँग्रेसचे नेते अशी जरूर आहे. परंतु तालुक्यातील काँग्रेसला त्यांचे कितपत बळ मिळते, हे विचार करण्यासारखे आहे. नलवडे यांचेही तसेच काहीसे आहे.

इचलकरंजी शहरातही काँग्रेसला मोठे काम करण्याची गरज आहे. तिथे आतापर्यंत काँग्रेसला पर्यायी शब्द आवाडे असा झाला होता. हा पक्ष खासगी मालकीचा असल्यासारखे झाले. त्यामुळे आवाडे यांनी झेंडा बदलल्यावर काँग्रेस अस्तित्वहीन झाली.

आता राहुल खंजिरे, अभ्यासू कार्यकर्ते शशांक बावचकर, संजय कांबळे यांच्यामुळे ती तग धरून आहे. तिला बळ देण्याचे आणि वाढवण्याचे खरे आव्हान आहे.

पक्षाची ही आहे ताकद…

करवीर, राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले, शिरोळ, चंदगडमध्ये काँग्रेस लढण्याच्या तयारीत आहे. तिथे एकतरी भक्कम गट व नेता पक्षासोबत आहे. पक्षाचे आज करवीर, कोल्हापूर शहर, कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदार संघात आमदार आहेत.

दहापैकी चार आमदार असलेला तसा हा जिल्ह्यातील एकमेव पक्ष आहे. विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. या बळावर लोकसभेसाठी दावा सांगितला आहे.

आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांनी मनांत आणले तर लोकसभेची जागाही काँग्रेसला अवघड नाही. बहुजन समाजासह दलित, मुस्लीम, इतर अल्पसंख्याक आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडोनंतर तरुणाईमध्येही काँग्रेसबद्दल आकर्षण आहे.

या उभारी देणाऱ्या बाबी असून पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी आता चांगले वातावरण आहे. जनसंवाद यात्रा त्यासाठी चांगले माध्यम ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here