साप… नाव घेताच अनेकांना घाम फुटतो. विचार करा, अचानक साप समोर आला तर काय होईल? सापाला पाहिल्यावर तुम्ही काय कराल? साहजिकच जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न कराल किंवा साप तुम्हाला चावेल या भीतीने तुम्हीच आधी त्याच्यावर हल्ला कराल.
पण अचानक साप समोर आल्यावर यापैकी काहीही करायचं नाही. सापापासून वाचण्याचा सोपा असा उपाय आहे.
साप अचानक समोर आला तर काय करायचं, असा प्रश्न क्वोरा या सोशल मीडिया प्लॅटॉर्मवर विचारण्यात आला. त्यावर काही युझर्सनी उत्तरं दिली आहे. त्यानुसार साप समोर आल्यावर तुम्ही त्याच्यावर हल्ला करू नका किंवा तिथून भीतीनं पळून जाण्याचीही धडपड करू नका. मग नेमकं करायचं काय, त्याबाबत क्वोरावर एका युझरने काय माहिती दिली आहे ते पाहुयात.
आशिष पवार नावाच्या युझरनं सांगितलं की, “साप कधीही विनाकारण चावत नाही. त्याला आपल्यापासून कळतनकळतपणे काही त्रास झाला, त्याला आपल्यापासून धोका वाटला तरच तो स्व:रक्षणार्थ हल्ला करतो. माणूस त्याचं नैसर्गिक भक्ष्य नाही त्यामुळे तो त्याच्या भक्ष्यावर ज्या त्वेषाने आणि हेतूने हल्ला करेल तसाच हल्ला आपल्यावर करेल याची शक्यता नाही. पण याच बरोबर दरवर्षी भारतात 50 हजार लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात हे विसरू नका. आपला हेतू कितीही चांगला असला, आपल्याला सापास काहीही त्रास द्यायचा नसला तरी दुर्दैवानं ते सापाला माहिती नसतं. तो त्याच्या कुवतीप्रमाणे आपल्या हालचालींचा अर्थ काढतो आणि तशी प्रतिक्रिया देतो”
आशिष म्हणाला, “साधारणपणे माझी अशी सवय आहे कि साप दिसला कि लगेच तो कोणत्या जातीचा आहे ते ओळखायचं. बिनविषारी असेल तर थोडं रिलॅक्स होता येतं आणि विषारी असेल तर मात्र 100% अलर्ट व्हायचं. कदाचित नाहीच ओळखता आला किंवा थोडेफार जरी कन्फ्युझन असेल तर मात्र तो साप विषारी असेल असंच मानून चालायचं”
आशिषनं सांगितलं, “सापाच्या हल्ल्यापासून वाचण्याचा सर्वात पहिला उपाय म्हणजे आपण एकदम स्तब्ध होणं गरजेचं आहे. आपल्या हालचालीमुळे साप विचलित होऊन हल्ला करू शकतो. जर साप त्याच्या नैसर्गिक अधिवासात असेल, मनुष्यवस्ती जवळ नसेल तर त्याला त्याच्या मार्गाने जाऊ देईन. जर मी त्याच्या खूप जवळ असलो तर हळू हळू मागे जाईन. पण शक्यतो साप त्याच्या मार्गानेच जातो असा अनुभव आहे.”
सापाला कान नसतात मग ते पुंगीच्या तालावर कसं नाचतात? अनेकांचे आहे गैरसमज
“साप जर मात्र चुकून मनुष्य वस्तीत आला असेल तर त्याला सुरक्षितपणे पकडून, वनखात्याचे नियम पाळून परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावं. मी सर्पमित्र बनण्याचं शात्रशुद्ध प्रशिक्षण जाणकार लोकांकडून घेतलं आहे. म्हणूनच सापाला हात लावायचे धाडस करू शकतो”, असं आशिष म्हणाला.
म्हणजेच तुम्ही जर साप पकडण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नसेल तर सापाला स्वतः पकडायला जाऊ नका. सर्पमित्र किंवा वनविभागाला याबाबत कळवा.