आपल्या घरातल्यांपैकी किंवा आजूबाजूच्यांपैकी काही जण शाकाहारी (व्हेजिटेरियन) असतात, तर काही जण मांसाहारी (नॉन-व्हेजिटेरियन). मांसाहारी व्यक्तींसाठी चिकन, मटण, मासे असे पदार्थ जीव की प्राण असतात.
ज्यांना हे पदार्थ खाण्याची सवय असते त्यांना या मांसाहारी पदार्थांपासून दूर ठेवणं फार कठीण असतं; मात्र तज्ज्ञांच्या मते, आपण फक्त एक महिना मांसाहार सोडला तरी अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. मांसाहार सोडल्यानंतर शरीरात होणारे चांगले बदल बघून अनेक मांसाहारप्रेमींचं मतपरिवर्तन होऊ शकतं. मांसाहार बंद केल्याने हृदयाचं आरोग्य सुधारते, हाय ब्लड प्रेशर, डायबेटीस आणि काही प्रकारच्या कॅन्सरचाही धोका कमी होतो.
बद्धकोष्ठतेची समस्या होईल नष्ट : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने फक्त महिनाभरासाठी मांसाहार सोडला आणि शाकाहारी पदार्थांचं सेवन सुरू केलं, तर तिच्या आरोग्यात अनेक चांगले बदल होतील. शाकाहारी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असल्याने पचनशक्ती सुधारते. परिणामी बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. शाकाहारामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित राहते आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.
वजन कमी करण्यात होईल मदत : शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होतं. मांसाहाराच्या तुलनेत त्यात कमी कॅलरीज असतात आणि फायबर्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं.
कोलेस्टेरॉल राहील नियंत्रणात : मांसाहारी पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हाय कोलेस्टेरॉलची समस्या उद्भवू शकते. महिनाभर मांसाहार टाळल्यास शरीरातल्या कोलेस्टेरॉलची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रणात येते. शाकाहारी पदार्थ रक्तातल्या कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करतात.
सूज कमी होईल : मांस, मासे आणि प्रक्रिया केलेलं मांस खाल्ल्याने शरीरात अंतर्गत सूज वाढू शकते. हे पदार्थ टाळल्यास हा त्रास बर्याच प्रमाणात कमी करता येतो. हा प्रकार विविध जुनाट आजारांशीदेखील संबंधित आहे.
ऊर्जा वाढेल : शाकाहारी अन्नातून शरीराला अनेक प्रकारची पोषकतत्त्वं मिळतात. जीवनसत्त्वं, खनिजं, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरात जातात. हे घटक शरीरातली ऊर्जा पातळी वाढवून आळस दूर करतात. याउलट मांसाहारी पदार्थ खाल्याने सुस्तपणा जाणवतो.
एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे, की तज्ज्ञांच्या मते, मांसाहार आणि शाकाहार हा दोन्ही प्रकारचा आहार व्यक्तीसाठी कमी-जास्त प्रमाणात चांगला असतो. फक्त हा आहार संतुलित प्रमाणात घेणं गरजेचं आहे.