
पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. समाजासाठी काहीतरी करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी दादा ठामपणे उभे असतात. त्यांना मदत करतात. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनाही हा अनुभव आला. राहीबाईनी दादांकडे जागेची अडचण मांडली आणि दादांनी एक महिन्यात घर बांधून पूर्ण करून दिले.
देशी वाणांचे संवर्धन करण्यासाठी राहीबाई प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कामाचे देशभर कौतुक झाले आणि त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले. देशभरातील अभ्यासक त्यांच्या घरी भेटी देऊ लागले. पण ते पुरस्कार ठेवायला, येणारे अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांना बसायला आणि बियाणांची साठवणूक करायला राहीबाईंकडे जागाच शिल्लक नव्हती. कंटाळून त्यांनी हे काम सोडून देण्याचा विचार केला. मात्र त्याचवेळी त्यांची भेट चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी झाली. काम सोडून देण्याचा विचार राहीबाईंनी दादांकडे व्यक्त केला. आणि दादांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केले. राहीबाईनी दादांकडे जागेची अडचण मांडली आणि दादांनी एक महिन्यात घर बांधून पूर्ण करून दिले. दादा स्वतः त्या घराच्या उद्घाटनासाठीही गेले होते. दादांनी राहीबाईंना बहीण मानले. आणि दोघातील भावा बहिणीचे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे.
आजही प्रत्येक रक्षाबंधनाला राहीबाई बियाणापासून बनवलेली राखी चंद्रकांतदादांना पाठवतात. “दादांचे उपकार आपण कधीही विसरणार नाही”, अशी भावना राहीबाई नम्रपणे व्यक्त करतात तेव्हा दादांचे वेगळेपण अधोरेखित होते. अशा प्रकारे चंद्रकांत पाटील समाजातील अनेक गरजूना मदतीचा हात पुढे करत असतात.

