दोन खासदार कमी होणार; पण २ नवे येतील का? राज्यसभेला भाजप पुण्यातून कोणाला देणार संधी

0
88

 राज्यसभेच्या एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील ६ जागा आहेत. त्यासाठीची निवडणूक होईल, मात्र राज्यसभेचे हे खासदार निवडून देणाऱ्या विधानसभेतील आमदारांच्या संख्येत मागील वर्षभरात बरीच पडझड झाली आहे.

त्यामुळे पुण्यातून दोन जागा कमी होणार हे नक्की असले तरी दुसऱ्या दोन जणांना संधी मिळू शकते का, यावर चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या निर्णयावर ते अवलंबून आहे.

मतदारांचे पक्षांतर :

राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी विधानसभेतील आमदार मतदार असतात. मागील वर्ष-दीड वर्षात राज्यातील आमदार इकडे-तिकडे झाले आहेत. शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे गट व ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. काही महिन्यांनी तशीच फूट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडली आणि शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. यातील ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडील आमदारांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. भाजपचे आणि काँग्रेसचे सर्व आमदार अद्याप त्यांच्याच पक्षात आहेत.

सद्य:स्थिती काय? :

महाविकास आघाडी असणाऱ्या काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यामध्ये काँग्रेसच सध्या शक्तिवान आहे. दुसरीकडे महायुतीतील भाजपकडे त्यांचे आमदार आहेतच; पण राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांचे आमदारही आहेत. त्यामुळे राज्यसभेसाठी कोण किती उमेदवार देणार, त्यांचे मतदान कसे ठरणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता असलेल्या पक्षनिहाय आमदारांच्या संख्येवर राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ रिक्त जागांपैकी ५ जागा महायुतीकडे आणि १ जागा महाविकास आघाडीकडे असे होऊ शकते. या ६ पैकी ॲड. वंदना चव्हाण आणि प्रकाश जावडेकर हे पुण्यातील आहेत. त्यांची मुदत संपल्यामुळे पुण्यातील राज्यसभेचे २ खासदार कमी होत आहेत.

अजित पवार गटाला संधी की बाहेरून आयात उमेदवार?

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र असताना ॲड. वंदना चव्हाण यांना दोन वेळा राज्यसभेसाठी संधी मिळाली. भाजपने प्रकाश जावडेकर यांना संधी दिली. आता चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आहेत.

त्या गटाची संधी संपल्यात जमा आहे. त्याचवेळी अजित पवार गट मात्र त्यांच्या आमदारांची संख्या दाखवून भाजपकडे राज्यसभेची एक जागा मागू शकतात. जावडेकर केंद्रीय मंत्रिमंडळात होते, नंतर त्यांना डावलण्यात आले. आता भाजपकडून खासदारकीची संधी पुन्हा दिली जाईल का? आणि ते नसतील तर पुण्याला संधी दिली जाईल की बाहेरचा खासदार देतील, असा प्रश्न आहे.

पुण्यातून किमान एकाला संधी :

भाजपने ५ जागांमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गट यांना सामावून घेतले तर अजित पवार पुण्यातून उमेदवार देऊ शकतात, मात्र त्यांच्याकडेही राज्यभरातून मागणी होण्याची चिन्हे आहेत. शिंदे गट त्यांच्या जागेसाठी पुण्याचा विचार करण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसच्या वाट्याला १ जागा आहे, मात्र ते पुण्यातून उमेदवार देतील का, याविषयी शंका आहे. फक्त १ जागा असल्याने त्यांच्याकडील इच्छुकांची संख्या बरीच आहे. फक्त भारतीय जनता पक्षच पुण्यातून किमान एकाला संधी देऊ शकते, अशी आताची राजकीय स्थिती आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना : ८ फेब्रुवारी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : १५ फेब्रुवारी

उमेदवारी अर्ज छाननी : १६ फेब्रुवारी

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : २० फेब्रुवारी

मतदान : २७ फेब्रुवारी सकाळी ९ ते दुपारी ४

मतमोजणी आणि निकाल : मतदान झाल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता निकाल जाहीर हाेणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here