India’s Mission Mauritius vs China Maldives: २०१५ मध्ये मॉरिशसच्या अधिकृत भेटीदरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसला “लिटल इंडिया” असे संबोधले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राजकीय दौरा याच मॉरिशसमध्ये होणार आहे.
द्रौपदी मुर्मूंची ही भेट म्हणजे मालदीवमधील चीनचे डावपेच उद्ध्वस्त करण्याचे नवे धोरण मानले जात आहे. द्रौपदी मुर्मूंची ही भेट ११ ते १३ मार्च दरम्यान होणार आहे. मुर्मू या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. मॉरिशसचा राष्ट्रीय दिवस १२ मार्च रोजी साजरा केला जातो. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध १९४८ मध्ये प्रस्थापित झाले होते. त्यानंतर सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पूर्ण कार्यक्रम काय?
२००० या वर्षापासून मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणाऱ्या द्रौपदी मुर्मू या सहाव्या भारतीय राष्ट्रपती आहेत. या समारंभात भारतीय नौदलाची तुकडी आणि दोन युद्धनौकांसह INS तीर आणि CGS सारथी देखील सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारत मॉरिशससोबत १४ करार करू शकतो. मोदी सरकारच्या सागर धोरणांतर्गत मॉरिशसमध्ये सहा नवीन प्रकल्पही पूर्ण होणार आहेत. या दौऱ्यात त्या अनेक बड्या नेत्यांनाही भेटणार आहेत. यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी हवाई तळ आणि नौदल बंदर विकसित करण्यास हिरवा कंदील दाखवला होता.
लष्करी तळ महत्त्वाचा का?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर भारतासोबतचे मालदीवचे संबंध बिघडू लागले आहेत. त्यांची चीनशी जवळीक वाढत आहे. या दरम्यान, एक बातमी अशीही आली आहे की, १० मार्चपासून भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. पूर्वनिर्धारित मुदतीनुसार भारतीय सैन्य मालदीवमधून माघार घेतील. या दरम्यान, मुर्मू यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मॉरिशस बेट ज्यावर भारत आणि मॉरिशस संयुक्तपणे लष्करी तळ बांधत आहेत ते मॉरिशसच्या मुख्य बेटापासून ११०० किलोमीटर अंतरावर आणि मालदीव, सेशेल्स आणि अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या डिएगो गार्सियाच्या मध्यभागी आहे. त्यामुळेच ते लष्करी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.