९ मे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५ वी पुण्यतिथी विशेष, रयत शिक्षण संस्थेची स्थापना ते पद्मभूषण, जाणून घ्या त्यांच्याविषयी

0
113

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा. कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. ‘स्वावलंबनाने कमवा आणि शिका’ हा त्यांचा मंत्र होता. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील काले या गांवात केली. भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. भाऊराव पाटील यांना १९५९ साली त्यांच्या कार्याबद्दल ‘पद्मभूषण’ हा पुरस्कारही मिळाला. आज ९ मे २०२४ रोजी त्यांची ६५ वी पुण्यतिथी आहे. आज त्यांंच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांंच्या एकंंदरीत आयुष्या विषयी तसेच त्यांच्या कामाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
कर्मवीर भाऊराव पाटील यांंचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी त्यांंचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावात शेतकरी कुटुंबात झाला. भाऊराव यांनी लहानपणापासुनच आपले आयुष्य जात-पात न पाळता असपृश्यांंसोबत आणि त्यांंच्यासाठी खर्ची घातले होते, त्यांंच्यावर राजर्षी शाहु महाराज यांंच्या कामाचा मोठा प्रभाव होता. भाऊरावांंनी दलित व अस्पृश्यांंच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण काम केले होते, कमवा आणि शिका योजना तसेच रयत शिक्षण संस्था ही त्याच कामाची उदाहरणे आहेत.भाऊराव पाटील यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले. त्यानंतर विद्यालयीन शिक्षण राजाराम हायस्कूल- कोल्हापूर येथे झाले. ते जैन बोर्डिंगमध्ये राहात होते. त्यानंतर भाऊराव सातारा येथे आले आणि त्यांनी शिकवण्या घेण्याचे काम सुरू केले. त्याच काळात त्यांनी दुधगाव शिक्षण मंडळाची स्थापना केली. त्यांना माधवअण्णा मास्तरांनी साथ लाभली. भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर यांच्या साथीने त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. त्यांनी ओगले ग्लास फॅक्‍टरी आणि किर्लोस्कर कारखान्यात काही काळ नोकरी केली; परंतु नोकरीत त्यांचे मन रमले नाही.४ ऑक्‍टोबर १९१९ रोजी विजया दशमीच्या मुहूर्तावर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कऱ्हाड जवळच्या काले गावात केली. सन १९२४ मध्ये रयतचे कार्यालय सातारा येथे हलवण्यात आले. रयत शिक्षण संस्था स्थापण्यामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे, मागासवर्गीयांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विना फी शिक्षणाच्या संधी निर्माण करणे, सर्व जाती-धर्मांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, सामाजिक सुधारणांसाठी जुन्या प्रथा, रूढी- परंपरा, चालीरीती बंद करणे, एकत्र काम करण्यावर भर देणे आणि एकी हेच बळ याचा पुरस्कार करणे, विद्यार्थ्यांना चांगले वळण लावणे, वरिष्ठांबद्दल त्यांच्या मनात आदरभाव निर्माण करणे, विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे, त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढवून त्यांना महत्त्वाकांक्षी बनवणे, त्यांना स्वाभिमानी बनवणे, शैक्षणिक शाखांचे विस्तारीकरण करून अनेकांना शिक्षणाच्या संधी निर्माण करणे.भाऊराव पाटील यांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थी घडवताना इतर शिक्षणावर भर दिला. सर्वांगीण विद्यार्थी घडवून त्यांच्या श्रमाचे चीज व्हावे यासाठी ते जन्मभर झगडले. भाऊराव पाटील यांनी सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग नावाचे मोठे वसतिगृह बांधले, ते चालवण्यासाठी पैसा कमी पडला तेव्हा त्यांच्या पत्नीचे दागिने विकून ते काम नेटाने पुढे सुरू ठेवले. शिक्षण संस्था आणि वसतिगृहे चालवताना अनंत अडचणी आल्या; परंतु त्यातून मार्ग काढत ते पुढे गेले. दिनांक २५ फेब्रुवारी १९२७ रोजी सातारा येथील वसतिगृहाचे “छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस’ असे नामकरण महात्मा गांधी यांच्या हस्ते झाले. महात्मा गांधी यांनी दरवर्षी ५०० रु.ची देणगी हरिजन सेवक फंडातून देण्यास सुरवात केली. १६ जून १९३५ मध्ये रयत शिक्षण संस्थेची अधिकृतपणे त्यांनी नोंदणी केली. त्याच वर्षी त्यांनी सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सातारा येथे सुरू केले. त्यानंतर महाराजा सयाजीराव हायस्कूलची सातारा येथे सुरवात केली. हे हायस्कूल विना फी असलेले आणि कमवा आणि शिका या योजनेवर आधारित सुरू केले. त्यानंतर १९४७ मध्ये त्यांनी अशा प्रकारची अनेक हायस्कूल सुरू केली.सन १९५४ मध्ये त्यांनी सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज सुरू केले. त्यानंतर लगेचच कऱ्हाड येथे संत गाडगेबाबा कॉलेज सुरू केले. सन १९५५ मध्ये चांगले शिक्षक घडवण्याच्या उद्देशाने, मौलाना आझाद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले. त्यांचा प्रमुख उद्देश शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा होता. या सर्व कार्यात महात्मा फुलेंचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा होता. भाऊराव पाटील यांनी सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी ३८ वसतिगृहे असलेल्या शाळा आणि हायस्कूल सुरू केली, तसेच ५७८ शाळा, सहा ट्रेनिंग कॉलेज, १०८ हायस्कूल आणि तीन महाविद्यालये सुरू केली. महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना “कर्मवीर’ ही पदवी दिली. कृतिशील राजा असाच त्याचा अर्थ आहे. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील फार मोठी शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केली.सन १९५९ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुणे विद्यापीठाने डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केले. त्याचवर्षी भारत सरकारने पद्‌मभूषण देऊन त्यांना सन्मानित केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय केले. कर्मवीर भाऊराव पाटील ९ मे १९५९ रोजी त्यांचे निधन झाले. ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य कायम आठवणीत राहणारे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांंच्या मृत्यु पश्चात सातारा येथे त्यांंचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन उभारण्यात आले आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here