
प्रतिनिधी : जानवी घोगळे
सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता भासत असून सध्या तब्बल १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के प्रमाणात सुमारे ८ हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर प्रथम अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असून त्यानंतर फेब्रुवारी–मार्चपासून शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
सध्या २०२५–२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. संचमान्यता पूर्ण झाल्यानंतर १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केले जाईल. यामुळे काही रिक्त पदे भरली जाणार असून त्यानंतरही जी पदे रिक्त राहतील, त्या पदांसाठी थेट भरती करण्यात येणार आहे.
दरम्यान, नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय वड्डेटीवार, भास्कर जाधव, नाना पटोले, बळवंत वानखेडे यांच्यासह अनेक आमदारांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला होता. शाळांमधील शिक्षकांची कमतरता ही गुणवत्तेच्या घसरणीचे प्रमुख कारण असल्याचे नमूद करत शिक्षक भरतीची जोरदार मागणी करण्यात आली होती. यानंतर शालेय शिक्षण विभागाने रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे.
शिक्षण विभागाने जिल्हानिहाय रिक्त शिक्षक पदांची माहिती संकलित केली असून ‘टीईटी’ परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करून उर्वरित रिक्त पदांसाठी ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिराती मागवण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने ‘पवित्र’ पोर्टलवरूनच राबवली जाईल, अशी माहिती शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती
राज्यात सध्या सुमारे ६३ हजार जिल्हा परिषद शाळा असून त्यामध्ये जवळपास १ लाख ९८ हजार शिक्षक कार्यरत आहेत. मात्र तरीही १५,१५८ पदे रिक्त असून त्यापैकी ८ हजार पदे भरतीद्वारे भरण्याचे नियोजन आहे.
शिक्षकांच्या बदल्या आता जूनपूर्वी
दरवर्षी ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्या जातात. साधारणतः ६५ ते ७० हजार शिक्षकांच्या बदल्या होतात. मात्र ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिल्याने शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच शिक्षकांची बदली होत असे, ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत होता. ही बाब लक्षात घेऊन आता जिल्हाअंतर्गत शिक्षक बदल्या एप्रिल ते जून या कालावधीत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माहिती तंत्रज्ञान बातम्या

