
पाचगाव प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
पाचगाव ग्रामपंचायतीच्या विकासात्मक वाटचालीत आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत प्रभाग क्रमांक २ मधील पंचशील कॉलनी (चौक) ते महालक्ष्मी पार्क या कॉलनीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा आज विधिवत शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ५ मधील द्वारका नगर येथील अंतर्गत काँक्रीट रस्त्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विकासकामांचा शुभारंभ पाचगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. प्रियंका पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपसरपंच सौ. दिपाली गाडगीळ, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय कोअर कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.नवीन काँक्रिट रस्त्यामुळे पावसाळ्यातील चिखल, धूळ व वाहतुकीच्या अडचणी दूर होणार असून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तसेच द्वारका नगरमधील अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने स्थानिक रहिवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे.
याप्रसंगी बोलताना सरपंच सौ. प्रियंका पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गावाच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकूणच, या रस्ता विकास कामांमुळे पाचगावच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली असून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


