
प्रतिनिधी : जानवी घोगळे
– मा. सागर वातकर, प्रसिध्द वक्ते, ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर
विवेकानंद कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर प्रतिनिधी
देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करायचे असेल, तर युवक पिढीला योग्य दिशा, मूल्ये आणि आशावाद देणे अत्यंत आवश्यक आहे. आजचा तरुण दिशाहीन होत चालला असून त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि विवेक या स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा अंगीकार केल्यासच सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन ताराराणी विद्यापीठाचे प्राध्यापक व प्रसिध्द वक्ते मा. सागर वातकर यांनी केले.
ते विवेकानंद कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त आयोजित ‘स्वामी विवेकानंद आणि युवक’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात होते.
मा. वातकर पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंदांना केवळ शिक्षित नव्हे तर चारित्र्यसंपन्न, विचारशील आणि राष्ट्रभक्त युवक अपेक्षित होता. शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व घडविणे हे त्यांचे स्वप्न होते. भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणारी, ज्ञान-विज्ञान व सुसंस्कारांनी प्रेरित पिढी घडली, तरच भारत पुन्हा एकदा जगद्गुरु होऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांनी सजग समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. एस. पी. थोरात म्हणाले की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्य स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित आहे. आजचा तरुण संभ्रमावस्थेत असून शिक्षकांनीच विवेकानंदांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आत्मानंद शोधण्याची कला शिक्षकांकडे आहे. युवकांनी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा व देशउभारणीत योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. अविनाश गायकवाड यांनी करून दिली. प्रा. समीक्षा फराकटे यांनी सुत्रसंचालन केले तर डॉ. अस्मिता तपासे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ. ई. बी. आळवेकर, डॉ. कविता तिवडे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. सौ. शिल्पा भोसले, प्रा. एम. आर. नवले, प्रा. बी. एस. कोळी, रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे यांच्यासह संस्थेतील विविध संस्कार केंद्रांमधील ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

