
कोल्हापूर प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
आनंद शिक्षण संस्था, टोप संचलित प्रिन्स इंग्लिश मीडियम स्कूल, टोप यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडले. चिमुकल्यांच्या कलागुणांनी स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली असून कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण चौगुले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सर्जन डॉ. सोपान चौगुले तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पहिल्या महिला चित्रकर्त्या डॉ. अल्पना सोपान चौगुले या उपस्थित होत्या. तसेच टोप गावाचे तंटामुक्त अध्यक्ष श्री. मानसिंग गायकवाड आणि साई संस्थान टोपचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
मोंटेसरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. नृत्य, अभिनय, समूहगीत आणि शैक्षणिक सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, कल्पकता व संस्कारशील शिक्षणाचा प्रत्यय आला. संस्थेच्या माध्यमातून घडलेले माजी विद्यार्थीही यावेळी उपस्थित राहून शाळेबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना दिसून आले.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पहिल्या महिला चित्रकर्त्या म्हणून डॉ. अल्पना सोपान चौगुले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा क्षण उपस्थितांसाठी अभिमानास्पद ठरला.
या स्नेहसंमेलनास शिक्षक, पालक व विद्यार्थीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद शिक्षण संस्थेच्या मूल्याधिष्ठित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची झलक या स्नेहसंमेलनातून स्पष्टपणे दिसून आली.

