
कोल्हापूर प्रतिनिधी : जानवी घोगळे
सायबर संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन या महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेविका कुमारी हर्षल सागर पाटील (बी.ए. डी.एम.एफ.सी. – II) हिची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन 2026 (SRD) साठी निवड झाली आहे. हे संचलन मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. ही निवड महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब असून, कुमारी हर्षल पाटील हिने आपल्या शिस्तबद्ध व समर्पित कार्यातून ही संधी मिळवली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) माध्यमातून सामाजिक कार्य, राष्ट्रसेवा, शिस्त आणि नेतृत्वगुण यांचा प्रत्यय तिने वेळोवेळी दाखवून दिला आहे.या यशामागे महाविद्यालयाच्या एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी श्रीमती रामेश्वरी गुंजीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे हर्षलने हे यश संपादन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांनी कुमारी हर्षल पाटील हिचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. आर. ए. शिंदे सर व सचिव एच. आर. शिंदे सर यांनीही तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून भविष्यातही असेच यश मिळवावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक गुणवत्तेचा नावलौकिक वाढला असून, इतर विद्यार्थिनींसाठीही ही एक प्रेरणादायी बाब ठरत आहे.

