
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. २३ : राज्य शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. लक्षित गटातील स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजनेंतर्गत कोल्हापूर येथे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी सध्या नावनोंदणी सुरू असल्याची माहिती अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी दिली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या योजनेत अमृत उद्योग कौशल्यवर्धन,अमृत सूर्य मित्र सोलार इन्स्टॉलेशन टेक्निशियन, अमृत जागतिक व्यापार(आयात-निर्यात) अमृत अलंकार ( इमिटेशन ज्वेलरी मेकर),अमृत आरीवर्क, अमृत अन्नपूर्णा, अमृत ग्लॅमर ( प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट), ड्रोन पायलट प्रशिक्षण, मोबाईल फिल्म मेकिंग, डिजिटल मार्केटिंग, फ्रोजन फुड इन्स्टंट पिठे तसेच अमृत बेकरी प्रशिक्षण असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून हे सर्व प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगार सुरू करण्यास उमेदवारांना मदत होणार आहे. त्याचबरोबर व्यवसाय सुरू करताना घेतलेल्या व्यावसायिक कर्जावर अमृत कडून मिळेल व्याज परतावा.
या प्रशिक्षण योजनांचा व व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी विलंब न करता अमृत संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश अमृतच्या लक्षित गटात करण्यात आला आहे. यामध्ये ब्राह्मण, बनिया, राजपुरोहित,कम्मा, कायस्थ, ऐयांगर, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, भूमिहार, येलमार, मारवाडी,ठाकूर,त्यागी, सेनगुनथर,गुजराती, जाट,सिंधी,कानबी, राजपूत,कोमटी,हिंदू नेपाळी इत्यादी जातींचा समावेश आहे. या जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले नागरिक अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
संपर्क क्रमांक
प्रशांत जोशी : 9112228764
अमृत जिल्हा कार्यालय : 9518900995
लिंक :https://forms.gle/igyAYnttYJMU4dVT6

