
फिलिपाईन्स येथील ‘लॉस बेनिओस’ विद्यापीठात प्रजासत्ताक दिन साजरा करताना कोल्हापूरचे आयुर्वेदिक शेती उत्पादक शेतकरी कुलदीप खोत व इतर मान्यवर शेतकरी.
मलेशिया -प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या वतीने राज्यातील निवडक प्रगतशील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी बारा दिवसांच्या अभ्यासदौऱ्यावर पाठवण्यात आले आहे. या अभ्यासदौऱ्यात मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या तीन देशांचा समावेश आहे.
या दौऱ्यासाठी निवड झालेले १५ शेतकरी सध्या फिलिपाईन्स देशात वास्तव्यास असून, तेथील जागतिक कीर्तीच्या ‘लॉस बेनिओस’ विद्यापीठात कृषी तंत्रज्ञानावर सखोल अभ्यास करत आहेत. या विद्यापीठाच्या आवारातच या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरा केला.
तिरंगा ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे गायन व भारतमातेच्या जयघोषाने विद्यापीठ परिसर दुमदुमून गेला. परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा अनुभव हा आयुष्यातील अविस्मरणीय व अभिमानास्पद क्षण असल्याची भावना सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या अभ्यासदौऱ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारचे तसेच कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे (मामा) यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी भारतीय शेतकरी म्हणून कुलदीप खोत (कोल्हापूर), कृष्णराव देशट्टीवर, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रणव नाडकर्णी, अविनाश येवले, तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल शिंदे, टुरिस्ट गाईड मझर शेख व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

