कोल्हापूर प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : छत्रपती राजाराम कारखान्याची सन २०२२-२३ ची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवार (दि. २९, ऑगस्ट) रोजी होऊन सभेचे कामकाज तब्बल दिड तास खेळीमेळीत चालले . सभेमध्ये सर्व विषयासह ऐनवेळीच्या विषयांना एक मताने मंजूरी देण्यात आली.
छ. शिवाजी महाराज, राजर्षि छ. शाहु महाराज व छ. राजाराम महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सभेस सुरुवात झाला.
राजाराम कारखान्याच्या आजच्या सभेत आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी सभासदांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व स्वागतामध्ये कारखान्याचे चेअरमन मा.आ. अमल महाडिक यांनी कारखाना मा. आ. महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गेली २८ वर्षे सक्षमपणे सुरू असून नुकत्याच झालेल्या निवडणूकीत संचालक मंडळास निवडून दिल्याबद्दल सभासदांचे जाहिर आभार व्यक्त करून सत्ता हे सेवेचे साधन मानून कारखान्याचे सभासदांचे हित जोपासले जाईल असे सांगितले.
भारताचे मा. पंतप्रधान, गृहमंत्री, रस्ते वाहतूक मंत्री, महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांनी साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या बाबत घेतलेल्या विधायक निर्णयाबद्दल धन्यवाद व्यक्त करून साखरेचा किमान विक्री दर रू.३६००/- प्रति क्विंटल करावा, ऊस पिकाचा पिक विमा योजनेत समावेश करावा, इथेनॉल प्रकल्पांना उभारणीसाठी बिन व्याजी कर्ज देऊन पेट्रोलमध्ये मिश्रणाचे प्रमाण २० टक्कयापर्यंत वाढवावे, इथेनॉल दरात वाढ करावी, व्याज अनुदानाच्या रक्कमा लवकर द्याव्यात, सहविज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विज खरेदीचा दर रु.६/- प्रति युनिट करावा, साखर निर्यातीस परवानगी द्यावी, निसर्गाच्या लहरी पणामुळे येत्या गळीत हंगामात पुरेसा ऊस उपलब्ध होणार नाही या करिता कारखान्यांच्या कर्जास मुदतवाढ देऊन व्याज अनुदान द्यावे. अशा विविध मागण्या सर्व सभासद शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे करीत असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.
कारखान्याचे विस्तारीकरण आणि सहविज निर्मिती प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर उपपदार्थ उत्पन्नातून सभासद शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या स्पर्धेत बरोबरीचा दर देणे शक्य होणार आहे. आपला कारखाना हा शहरामध्ये येत असून कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावामध्ये शहरीकरण, नागरीकरण, औद्योगिकीकरणामुळे तसेच प्रस्तावित महामार्गामुळे ऊस लागवडी खालील जमिनी कमी होत आहेत.
यामुळे वाढीव गळीत क्षमतेच्या प्रमाणात पुरेसा ऊस पुरवठा व्हावा म्हणून कारखान्याच्या लगतच्या गावांचा समावेश कारखाना कार्यक्षेत्रात करणेसाठी आणि सभासदांचा ऊस गळीतास येवून त्यांचा सहभाग वाढावा.
ऊस अन्य कारखान्यास पाठवायचा आणि राजाराम कारखान्याचे संचालक होण्याचा प्रयत्न करायचा हे अत्यंत चुकीचे असलेने संस्थेच्या प्रती विश्वास असणाऱ्या सभासद व्यक्ती संचालक म्हणून निवडल्या जाव्यात यासाठी पोट नियम दुरूस्ती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सभासद हिताचे निर्णय घेवून ध्येय साध्य करीत असताना काही लोकांच्याकडून दिशाभूल केली जात आहे. पण या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावरून मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय करून दाखवता याकडे सभासदांचे लक्ष असते.
राजकारण हे निवडणूकीपूरते मर्यादीत ठेवून सभासद हित जोपासणे गरजेचे आहे, निवडणूकीमध्ये तुम्ही विस्तारीकरण करणार असा जाहीरनामा प्रसिध्द केला होता याची आठवण करून देतो, मग आम्ही उभारणी करत असलेल्या सहविज निर्मिती प्रकल्पास विरोध का ?
असेही त्यांनी विचारले.कार्यक्षेत्रात गावे वाढली आणि सभासद वाढले म्हणजे खाजगीकरण होते असे सांगून सभासदांना वेगळी दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे चुकीचे असून आमच्या या निर्णयाला सर्वच सभासदांनी पाठींबा देवून विकासासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कारखान्यामार्फत सभासदासाठी विविध ऊस विकासाच्या व आरोग्य व शासन अनुदाना संदर्भात मार्गदर्शनाच्या योजना राबविणेत येत असून त्या सर्व सभासदांपर्यंत पोहचवणार असून त्यासाठी स्वतंत्र माहिती कक्ष सुरू केला आहे.
त्याचा लाभ घ्यावा असे सांगून येत्या गळीत हंगामात किमान ५ लाख मे.टन ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी सर्व सभासदांनी आपला ऊस गळीतास पाठवावा असे आवाहन त्यांनी केले.कार्यकारी संचालक चिटणीस यांनी संपूर्ण विषयपत्रिकेचे वाचन केले आणि सभासदांनी विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे सभेमध्ये स्पष्टीकरणासह सविस्तरपणे वाचून दाखविली.
आभार कारखान्याचे संचालक श्री. शिवाजी रामा पाटील यांनी मानले आणि वंदे मातरम होऊन सभेची सांगता झाली. सभेस कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. नारायण चव्हाण व संचालक मंडळासह सभासद, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.