कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
वारणानगर : वारणा दूध संघाने अहवाल सालात सुमारे १३८९ कोटीं रुपयांची वार्षिक उलाढाल केली आहे. फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याबाबत निर्णय वारणा दूध संघाकडून घेण्यात येणार असून त्यानुसार म्हैस दूध उत्पादकास फरक बिल नको असल्यास सध्याच्या दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ आणि फरक बिल हवे असल्यास सध्याच्या दरात १ रुपयांनी वाढ देण्यात येऊन अडीच रुपये प्रमाणे फरक बिल देण्याबाबतची महत्वपूर्ण घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी वार्षिक सभेत केली.
येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघाचे कार्यस्थळावर पार पडली.
त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत करून दुग्ध व्यवसायासमोर अनेक आव्हाने असताना या परिस्थितीला सामोरे जाऊन संघाने यशस्वी वाटचाल केल्याचे सांगितले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.
डॉ. कोरे म्हणाले, संघाच्या दूध संकलन वाढीच्या दृष्टीने अनेक योजना राबविल्या. कोरोना महामारीचे संकट आणि जनावरांमध्ये शिरलेल्या लम्पीसारख्या आजारामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला.
अशा काळात वारणेने दूध उत्पादकांना दूध दर, विविध सवलती, फरक बिलासारखे लाभ दिलेत. सहकारी तत्वावरील संस्था मोडीत काढण्याचा बाहेरील कंपन्या जादा दराचे आमिष दाखवून कुटील डाव काही लोक करीत आहेत.
यावर पर्याय म्हणून फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याचा निर्णय वारणेने घेतला आहे. वारणा आणि गावातील सहकारी संस्थांमध्ये करार करण्यात येऊन सभासदाने पुरवठा केलेल्या दुधाची नोंद संघाच्या कार्यालयात होईल, त्यामुळे संस्थांच्या कमिशनमध्येही वाढ करण्यात येणार आहे.
यावेळी नॅशनल को ऑफ डेरी फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्रीनिवास सज्जा, व्यवस्थापक अविनाश घुले, संजीव आग्रवाल, भारतीय रेल्वेचे वारणाचे राष्ट्रीय वितरक अमित कामत, आंध्रप्रदेशातील दुग्ध व्यवसायातील उद्योजक हर्षा गांधी यांच्यासह दूध संघातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था, दूध उत्पादक व गोठेधारकांचा आमदार कोरे यांच्याहस्ते विशेष सत्कार आला.
कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
सभेस संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, लेखापरीक्षक रणजीत शिंदे, संघाचे सर्व संचालक मंडळ, वारणा समूहातील पदाधिकारी, अधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले.
सभेत ‘लोकमत’ वृत्तसमूहाचे अभिनंदन
लोकमत वृत्तसमूहाने बिझनेस अॅन्ड इंडस्ट्री विभागात वारणा दूध संघाचा व माझा केलेला सन्मान हा वारणेचे सर्व दूध उत्पादक सभासद व सर्व घटकांचा असल्याचा उल्लेख डॉ. कोरे यांनी करून लोकमतने केलेल्या वारणेच्या गौरवाबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले.
यावेळी सर्व सभासदांनी जोराने टाळ्यां वाजवून लोकमत समूहाचे अभिनंदन केले.