
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, वैयक्तिक नातेसंबंध आणि उज्ज्वल करिअर व्यसनांमुळे धोक्यात येऊ शकते. व्यसनांचे दुष्परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांनी सजग राहून व्यसनांपासून पूर्णतः दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि एन.सी.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज ते कोतोली या मार्गावर आयोजित व्यसनमुक्ती मिनी मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवाजीराव पाटील होते. प्रमुख उपस्थिती म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. बी.एन. रावण व सहसमन्वयक डॉ. एस.एस. कुरलीकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी एन.सी.सी. कॅडेट्सनी प्रभावी घोषणांद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देत समाजात व्यापक जनजागृती केली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध मॅरेथॉन आणि प्रेरणादायी घोषणांमुळे संपूर्ण परिसर व्यसनमुक्तीच्या संदेशाने भारावून गेला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट डॉ. मनीषा सावंत यांनी केले, तर आभार डॉ. यू.एन. लाड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
फोटो ओळ : श्रीपतराव चौगुले कॉलेजमधील व्यसनमुक्ती मिनी मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी शिवाजीराव पाटील, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. बी.एन. रावण, डॉ. एस.एस. कुरलीकर, लेफ्टनंट डॉ. मनीषा सावंत, डॉ. यू.एन. लाड व मान्यवर.

