ग्रामीण भागातून जागतिक संशोधन मंचावर झेपडॉ. अनिता कुंडलिक तावडे यांची चीनमधील फुझो नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधनासाठी निवड

0
20

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
सांगरूळ (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील डॉ. अनिता कुंडलिक तावडे यांची चीनमधील मेनलँड येथील Fuzhou National University मध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधनासाठी निवड झाली असून, ही बातमी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे. हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी यशकथा म्हणून पाहिली जात आहे.
शैक्षणिक वारसा नसलेल्या सामान्य कुटुंबातून येऊन, ग्रामीण वातावरणात जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमांच्या बळावर डॉ. अनिता तावडे यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे वडील श्री. कुंडलिक तावडे हे विवेकानंद कॉलेजचे कर्मचारी असून, मुलीने मिळवलेली ही आंतरराष्ट्रीय संधी संपूर्ण कुटुंबासह संस्थेसाठीही गौरवास्पद आहे.
नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रातील संशोधनात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळेच त्यांना ही प्रतिष्ठित पोस्टडॉक्टोरल फेलोशिप मिळाली आहे. चीनमधील नामांकित विद्यापीठात संशोधनाची संधी मिळणे ही कोल्हापूर जिल्ह्यातील संशोधकांसाठी मोठी उपलब्धी मानली जात असून, यामुळे स्थानिक पातळीवर शिक्षण व संशोधन क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
डॉ. अनिता तावडे यांचे प्राथमिक शिक्षण सांगरूळ हायस्कूल येथे, ज्युनियर सायन्सचे शिक्षण डी. सी. नरके महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर बी.एस्सी., एम.एस्सी. व पीएच.डी. (नॅनो टेक्नॉलॉजी) हे शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पूर्ण केले. संशोधन काळात त्यांना डॉ. तायडे व डॉ. शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थाचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे, तसेच विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी डॉ. अनिता तावडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. अनिता तावडे यांचे हे यश ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण, विज्ञान व संशोधन क्षेत्रात पुढे जाण्यासाठी दीपस्तंभ ठरेल, अशी भावना सांगरूळ व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here