
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
एड्स जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार
कोतोली प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त सहकार्याने, श्रीपतराव चौगुले कॉलेज (माळवाडी–कोतोली) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ‘रेड रिबन क्लब’ची स्थापना करण्यात आली. समाजात तसेच युवकांमध्ये एड्सविषयी योग्य माहिती, जागरूकता व प्रतिबंधात्मक दृष्टीकोन निर्माण करणे हा या क्लबचा प्रमुख उद्देश आहे.
या रेड रिबन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी व्याख्याने, भित्तीपत्रके, रॅली, स्लाईडशो, पथनाट्य अशा विविध प्रभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, एड्सबाबत असलेले गैरसमज दूर करून वैज्ञानिक व सामाजिकदृष्ट्या योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

क्लब स्थापनेची अधिकृत फाईल प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे समुपदेशक दीपक सावंत व टेक्निशियन संजय गायकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. यु. एन. लाड, प्रा. एम. वाय. पोवार व डॉ. एम. के. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान वाढण्यास मदत होणार असून, आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी महाविद्यालयाचे योगदान अधिक भक्कम होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
फोटो ओळ : श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये रेड रिबन क्लब स्थापनेची फाईल प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना दीपक सावंत व संजय गायकवाड; समवेत प्रा. एम. वाय. पोवार, डॉ. यु. एन. लाड, डॉ. एम. के. कांबळे.

