
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
पाचगाव प्रतिनिधी: गेल्या तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केंद्र शाळा पाचगावच्या निर्लेखन प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता लवकरच केंद्र शाळा पाचगावची नवीन, सुसज्ज इमारत विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार असून शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शाळेची इमारत मोडकळीस आलेली असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला.
या यशामागे सरपंच प्रियांका पाटील, माजी सरपंच संग्राम पाटील तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला.
याशिवाय, शाळेच्या दुरवस्थेबाबत करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तीकेयन यांना निवेदन देऊन प्रश्नाची दखल घ्यायला भाग पाडले.
मंजुरी मिळाल्याने नवीन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून, विद्यार्थ्यांना सुरक्षित, आधुनिक व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण मिळणार आहे. ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे.
यावेळी शाळा निर्लकन चे पत्र जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच दिपाली गाडगीळ, माजी सरपंच संग्राम पाटील व सदस्य यांना देण्यात आले.

