
कोतोली प्रतिनिधी -पांडुरंग फिरिंगे
बारावी सायन्स विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. बारावी सायन्सनंतर इंजिनिअरिंग व वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. त्या परीक्षांचे स्वरूप, तयारीची दिशा आणि योग्य नियोजन यांची माहिती विद्यार्थ्यांनी वेळेत करून घ्यावी, असे प्रतिपादन डॉ. दिग्विजय पवार यांनी केले.
ते वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधील ई. अॅण्ड टी.सी. इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख असून, श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील ज्युनिअर सायन्स विभागामार्फत आयोजित “बारावी नंतरच्या करिअर संधी” या विषयावरील व्याख्यानात मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयकुमार पाटील होते. प्रमुख उपस्थितीत संस्था सचिव शिवाजीराव पाटील, ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ. उषा पवार यांचा समावेश होता.
डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम निवड, कौशल्यविकास आणि करिअर नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी व क्षमतांचा विचार करून योग्य क्षेत्राची निवड करावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. प्रकाश लव्हटे यांनी केले, तर आभार प्रा. रविंद्र चौगुले यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ :
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये “बारावी नंतरच्या करिअर संधी” या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. दिग्विजय पवार; समवेत प्रा. प्रकाश लव्हटे, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. उषा पवार.

