चौगुले महाविद्यालयाची शैक्षणिक, गडकिल्ले सहल संपन्न

0
20

गोवा येथे पार पडलेल्या श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या शैक्षणिक सहलीदरम्यान उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी.

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील बी.एस्सी. व एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली गोवा येथील शैक्षणिक सहल अत्यंत यशस्वी व ज्ञानवर्धक वातावरणात संपन्न झाली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली.
या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी गोवा विद्यापीठ येथे भेट देऊन विद्यापीठातील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागांना भेट दिली. विविध आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन साधने तसेच ग्रंथालयाची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहून घेतली. त्यामुळे वैज्ञानिक अभ्यासाबाबत त्यांची दृष्टी अधिक व्यापक झाली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी गोवा सायन्स सेंटर येथील नक्षत्रालय (प्लॅनेटेरियम) ला भेट दिली. येथे २५ मिनिटांच्या माहितीपटाद्वारे सूर्यमालेतील ग्रह, तारे व अवकाशातील घडामोडींची माहिती देण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांनी विविध ३-डी मॉडेल्स व वैज्ञानिक प्रतिकृती पाहून अवकाशशास्त्राची सखोल समज प्राप्त केली.
सहलीच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी गोवा चर्च येथील पुरातत्त्व विभागाच्या संग्रहालयाला भेट दिली. येथे प्राचीन वैज्ञानिक साधने, नौकानयनशास्त्र, तत्कालीन टपाल व्यवस्था, पोस्टर व स्टॅम्प तिकिटे यांची माहिती मिळाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अग्वाद किल्ला येथे भेट देऊन गोव्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची व संरक्षण व्यवस्थेची माहिती जाणून घेतली.
या संपूर्ण शैक्षणिक सहलीसाठी प्रा. पी. बी. लव्हटे, प्रा. यू. बी. पवार, प्रा. टी. एस. कवठेकर, प्रा. आर. पी. नाळे, प्रा. एस. एन. माने, प्रा. ए. जे. शिंगे, प्रा. के. पी. नाईक तसेच कर्मचारी प्रवीण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवृद्धी, संशोधनाची आवड आणि ऐतिहासिक-जागतिक दृष्टीकोन विकसित करणारी ठरली, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here