
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे –
आजच्या बदलत्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत दुग्ध व्यवसाय हा केवळ पूरक नव्हे, तर स्वतंत्र आणि वाढता उद्योग बनत चालला असून तो प्रामुख्याने मध्यमवर्गीय शेतकरी व ग्रामीण कुटुंबांमुळे टिकून आहे, असे स्पष्ट प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या पशुधन विभागाचे व्यवस्थापक प्रकाश साळुंखे यांनी केले. खेड्या-पाड्यातील दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न गोकुळ संघाने सातत्याने केला आहे. नवीन पिढीने शास्त्रशुद्ध पद्धतीने पशुसंवर्धन केल्यास हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दिगवडे (ता. पन्हाळा) येथे आयोजित निवासी सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात दुग्ध व्यवसाय या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
साळुंखे पुढे म्हणाले की, आज केवळ १० ते २० टक्के जनावरे संकरीत असून भविष्यात आपल्याकडे अधिकाधिक जातिवंत जनावरे तयार होणे गरजेचे आहे. विशेषतः म्हैशीसाठी सरकारकडून जातिवंत जनावरांवर अनुदान दिले जाते. शेती नसलेल्या लोकांनाही दुग्ध व्यवसाय करणे शक्य आहे; मात्र त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक आहे.
जनावरांचे आरोग्य हेच दूध उत्पादनाचे गमक असल्याचे सांगत त्यांनी जनावरांना स्वच्छ व शुद्ध पाणी, संतुलित आहार आणि हवेशीर व स्वच्छ गोठ्याचे महत्त्व विशद केले. गढूळ पाणी दिल्यास जनावराचे पोट बिघडते, जंतसंसर्ग होतो आणि दूध उत्पादन घटते. त्यामुळे दिवसातून किमान तीन वेळा, साधारण ६० ते ७० लिटर स्वच्छ पाणी देणे आवश्यक आहे. जनावरांना शिजवलेले अन्न किंवा पालेभाज्या देऊ नयेत, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा दूध संस्था, दिगवडेचे चेअरमन रमेश पाटील होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेती प्रथम व दुग्ध व्यवसाय दुय्यम ही जुनी संकल्पना बदलत असून आज दुग्ध व्यवसाय स्वतंत्र उत्पन्नाचे मजबूत साधन बनत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महादेव पोवार, नंदकुमार पाटील, शहाजी पोवार, सचिन फाटक, राजेंद्र सुतार, नामदेव वजार्डे, सरदार पोवार, बंडा फाटक, सरदार पाटील, संतोष पवार, पांडुरंग मोहिते, विकास काळगावकर, बाजीराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बबन चौगुले यांनी केले, तर आभार प्रा. पी. डी. माने यांनी मानले.
या व्याख्यानास सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या दिगवडे येथील श्रमसंस्कार शिबिरात दुग्ध व्यवसाय विषयावर मार्गदर्शन करताना प्रकाश साळुंखे. समवेत रमेश पाटील, महादेव पोवार, नंदकुमार पाटील, शहाजी पोवार, सचिन फाटक, राजेंद्र सुतार, नामदेव वजार्डे, सरदार पोवार, बंडा फाटक, सरदार पाटील, संतोष पवार, पांडुरंग मोहिते, विकास काळगावकर, बाजीराव पाटील व मान्यवर.

