
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कळे शाखेचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात साजरा
कै. दादासाहेब चौगुले यांच्या दूरदृष्टीतून आणि पर्यावरण प्रेमातून लावलेले एक छोटेसे रोपटे आज भक्कम वटवृक्षात रूपांतरित होत असल्याचे दृश्य पाहून उपस्थितांच्या मनात अभिमान आणि भावुकता दाटून आली. या वटवृक्षाच्या साक्षीने कळे शाखेचा पाचवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यास शाखा सल्लागार प्रविण बाजीराव पाटील, शाखाधिकारी सतीश पाटील, चेअरमन डॉ. स्नेहदीप चौगुले, व्हाइस चेअरमन सुरेश माने यांच्यासह संचालक बाळू पोवार सदस्य, सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी कै. दादासाहेब चौगुले यांच्या कार्याचा गौरव करताना, “एक रोपटे म्हणजे भविष्याची गुंतवणूक” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला.

वर्धापनदिनानिमित्त शाखेच्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. प्रामाणिक सेवा, विश्वासार्ह कारभार आणि सामूहिक प्रयत्नांमुळे शाखा आज भक्कमपणे उभी राहिल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
वटवृक्षासारखीच शाखेची मुळे समाजात खोलवर रुजावीत आणि फांद्या दूरवर पसराव्यात, अशा सदिच्छा उपस्थितांनी दिल्या.
पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि विकासाचा संदेश देणारा हा वर्धापनदिन स्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.मुख्यकार्यकारी अधिकारी उत्तम चौगुले यांनी आभार मानले.

