विद्यार्थ्यांनी रेडीओ क्षेत्रात करीअर करावे — रेडीओ आर.जे. श्री. मनीष आपटे

0
24

प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे

कोल्हापूर प्रतिनिधी :
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या चौकटीबाहेर विचार करावा आणि रेडीओ क्षेत्रातील अमर्याद संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रसिद्ध रेडीओ जॉकी मनीष आपटे यांनी केले. ए.एम.-एफ.एम. चॅनेल्स, ऑल इंडिया रेडीओ, जाहिरात एजन्सी, स्क्रिप्ट रायटिंग, अनुवाद, तांत्रिक सेवा अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांची वाट पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या ज्युनियर आर्ट्स विभागातर्फे ‘नोकरी व करीअरच्या संधी’ या उपक्रमांतर्गत ग्रंथालय हॉलमध्ये या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांनी केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी करीअर घडवणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आर.जे. मनीष आपटे म्हणाले की, “उत्तम रेडीओ जॉकी होण्यासाठी केवळ आवाजच नव्हे, तर चौफेर वाचन, भाषा-साहित्याची जाण, सांस्कृतिक भान आणि प्रभावी संहिता लेखन कौशल्य आवश्यक आहे.” जे विद्यार्थी लिहिणे-वाचणे उत्तम प्रकारे करू शकतात, त्यांच्यासाठी रेडीओ हे सुवर्णसंधीचे क्षेत्र आहे, असेही त्यांनी नमूद केले.
रेडीओमध्ये करमणूक, लोकरंजन आणि लोकप्रबोधन यांचा सुंदर समतोल साधला जातो. शेती, शिक्षण, आरोग्य, बातम्या, हवामान, स्थानिक घडामोडी यांसारख्या जीवनाशी निगडित विषयांचे सोप्या व रंजक पद्धतीने सादरीकरण करण्याची कला आर.जे.कडे असणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. स्क्रिप्ट रायटर, जाहिरात लेखन, सेल्स, तांत्रिक कर्मचारी अशा विविध विभागांची माहिती असलेला विद्यार्थी रेडीओ क्षेत्रात निश्चितच उज्ज्वल भवितव्य घडवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थना गायनाने झाली. प्रा. नयना पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. सौ. एस. एन. ढगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनींसह गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेडीओच्या जगात करीअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम दिशादर्शक व प्रेरणादायी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here