कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : सर्वाधिक मूल्य असलेली दोन हजारांची नोट बँकांमध्ये जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा अवधी जरी शिल्लक राहिला असला, तरी गेल्या चार महिन्यांत कोल्हापूरकरांनी सुमारे ७५० कोटी रुपयांच्या दोन हजार नोटांचा भरणा बँकांत जमा केला आहे.
जमा झालेला दोन हजार रुपयांचा भरणा बँक ट्रेझरीकडून टप्प्याटप्प्याने रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती बँक वर्तुळातून देण्यात आली.
दोन हजारच्या नोटा बदलून घेण्याची अथवा बँक खात्यावर जमा करण्याची मुदत शुक्रवारी (दि. २९) सप्टेंबरला ग्राहकांसाठी बंद होत आहे. तर बँकांत जमा झालेल्या नोटा ट्रेझरीमार्फत ३० सप्टेंबरपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवून द्यावयाची मुदत आहे.
सध्या जमा झालेल्या नोटा एकत्रित करून रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याची बँकांची तयारी सुरू झाली आहे.
दोन हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी अथवा खात्यावर भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळेल किंवा नाही याबाबत बँकांकडे अद्याप स्पष्ट असे कोणतेच आदेश आलेले नाहीत.
त्यामुळे २९ सप्टेंबरनंतर कोणत्याच बँका अशा नोटा ग्राहकांकडून स्वीकारणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
१९ मे रोजी दोन हजारची नोट चलनातून मागे घेण्यात येत असल्याची घोषणा झाली.
तसेच आपल्याकडील नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली, अशी घोषणा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून बँकांमध्ये दोन हजारची नोट जमा करण्यासाठी अथवा नोटा बदलून घेण्यासाठी लोकांनी खूपच गर्दी केली.
बघता-बघता अनेक बँकांत दिवसाला कोट्यवधी रुपये जमा होऊ लागले. तर काही ग्राहकांनी बँकांत पैसे भरून ते एटीएमद्वारे लगेचच विड्रॉल केले.
बँकांत जमा झालेल्या दोन हजारच्या नोटा पुन्हा ग्राहकांना चुकूनही देऊ नयेत अथवा एटीएममध्येही अशा नोटांचा भरणा करू नये, अशा सूचना असल्यामुळे या नोटा बँकांत थप्पीला लागल्या. नोटबंदीच्या आदेशानंतर दीड महिन्याने या जमा झालेल्या नोटा बँका ट्रेझरीकडे पाठवू लागल्या.
कोल्हापुरातील सर्वच ट्रेझरीकडून गेल्या चार महिन्यांत सुमारे ७५० कोटी रुपयांच्या नोटा पाठवल्याची माहिती बँक सूत्रांनी दिली.
सध्या किरकोळ स्वरूपात बँकांकडे अशा नोटा जमा होताना दिसत आहे. त्याही ३० सप्टेंबरला रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहेत.
दोन हजारची चलनातील देवाण-घेवाण थांबली..
२ हजारची नोट २९ सप्टेंबरपर्यंत चलनात ग्राह्य धरली जाईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वी जरी जाहीर केले असले, तरी गेल्या एक महिन्यापासून मार्केटमध्ये अशी नोट कोणीही सहजासहजी स्वीकारत नसल्याचे वास्तव आहे.
अनेक पेट्रोलपंपांवर तर अशी नोट घेतलीच जात नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे अजूनही अशी नोट आहे त्यांना बँकेत २९ सप्टेंबरच्या आत भरणा केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.