कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आणि खासगी वजन काटे तपासणीसाठी सरकारने दिलेले सुमारे एक कोटी रूपयांचे मोबाईल क्रेन व्हॅन ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालय परिसरात दहा वर्षापासून वैधमापनशास्त्र प्रशासनाने लपवल्याचे संभाजी बिग्रेडने गुरूवारी उघड केले.
व्हॅन एकही किलोमीटर न फिरता अक्षरश: सडून जात आहे.
त्या व्हॅनचे उपरोधात्मक पूजन नारळ वाढवून बिग्रेडचे रूपेश पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी व्हॅनचा वापर दहा वर्षापासून न करता वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी प्रत्येक कारखान्यांकडून एक लाख रूपयांचा हप्ता घेवून वजन काटे तपासणीकडे दूर्लक्ष केले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने वैधमापन विभागास २०१४ साली अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली कोट्यावधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन दिली.
या व्हॅनव्दारे साखर कारखान्यांचे आणि खासगी मोठे वजन काटे तपासणी बंधनकारक आहे. मात्र वैधमापनशास्त्र प्रशासनाने हे वाहन ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालयाजवळ लावले. व्हॅन कार्यालयाच्या परिसरात झाडाखाली लावून ठेवले आहे. त्याचा वापरच नसल्याने ते सडून जात आहे.
संभाजी बिग्रेडने या व्हॅनचा शोध घेतला. त्यांनी व्हॅनचा वापर कोठे, कोठे केला, याची माहिती माहिती अधिकाराखाली घेतली. त्यावेळी वैधमापनशास्त्र प्रशासनाने वापर नसल्याची माहिती दिली. त्यामुळे कोल्हापूरकरांना बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी व्हॅनचे दर्शन घडवले. त्याचे पूजन केले.