Kolhapur: अवैध गर्भपात; साखरप्यातील डॉ. विजय गोपाळ अटकेत, रॅकेटमधील नववा आरोपी

0
86

कोल्हापूर : दोन महिन्यांपूर्वी क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमधील नववा आरोपी डॉ. विजय गोपाळ नारकर (वय ६३, रा. साखरपा, ता. देवरुख, जि.

रत्नागिरी) हा करवीर पोलिसांच्या हाती लागला. डॉ. नारकर याच्या दवाखान्यातून पोलिसांनीगर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केला. न्यायालयात हजर केले असता, त्याला सोमवारपर्यंत (दि. ११) पोलिस कोठडी मिळाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील एका घरात छापा टाकून कारवाई केली होती. त्या कारवाईत अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटचा भांडाफोड झाला. त्या गुन्ह्यात एका अधिकृत डॉक्टरसह एक बोगस डॉक्टर, टेक्निशिअन आणि एजंट अशा आठ संशयितांना अटक झाली होती. त्यांच्या चौकशीत साखरपा येथील डॉ. विजय नारकर याचे नाव समोर आले. अधिक चौकशीनंतर डॉ. नारकर याने आजवर अनेक महिलांचा अवैध गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी नारकर याला अटक केली.

दवाखान्याच्या झडतीत गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा पोलिसांच्या हाती लागला. डॉ. नारकर याच्याकडे रुग्णांना पाठवणारे एजंट आणि गर्भपाताची औषधे पुरवणारे वितरक पोलिसांच्या रडारवर आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

डॉ. नारकर ३५ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत

डॉ. नारकर याने बीएएमएस पदवी घेतली असून, गेल्या ३५ वर्षांपासून तो वैद्यकीय सेवेत सक्रिय आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांची त्याच्याकडे वर्दळ होती. अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या या रॅकेटमध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार यांनी दिली.

२५ हजारांचा दर

नारकर याच्याकडे गोपनीय पद्धतीने गर्भपाताची औषधे दिली जात होती. यासाठी तो रुग्णांकडून २५ हजार रुपये घेत होता. सुमारे ५०० रुपयांच्या किटसाठी त्याला तब्बल २४ हजार रुपये मिळत होते. त्याने आजपर्यंत किती गर्भपात केले आहेत, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here