स्वतंत्र विमानतळ सुरक्षा दलाला मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गृह विभागाकडे पाठवला आहे.

0
65

कोल्हापूर : विमानतळावर २४ तास कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागते. नियमित पोलिसांना या कामात मर्यादा येतात, त्यामुळे स्वतंत्र विमानतळ सुरक्षा दलाला मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गृह विभागाकडे पाठवला आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम होणार आहे.

उजळाईवाडी येथील विमानतळावरून सध्या रोज चार ते पाच विमानांचे उड्डाण होते. देशभरातील विमानतळांशी वाढणारा संपर्क आणि प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था भक्कम करणे आवश्यक आहे.

सध्या जिल्हा पोलिस दलातील ४४ पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ४४ कर्मचारी, अशा ८८ कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा व्यवस्थेचा भार आहे. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा आणि तपासणीसंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असते. अन्यथा सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्यास विमानतळावर आणि विमान प्रवासात गंभीर धोका उद्भवू शकतो.

असे प्रसंग टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वतंत्र विमानतळ सुरक्षा दलाचा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला आहे. या दलासाठी १३७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गरज आहे. याला मंजुरी मिळाल्यास सर्व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवून त्यांना प्रशिक्षित केले जाईल, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.

कोल्हापूर, सिंधुदुर्ग महत्त्वाची विमानतळे

कोल्हापूर आणि सिंधुगुर्ग येथील विमानतळांवरून विमानसेवा सुरू करतानाच त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. कोल्हापूर विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढत आहे. येणाऱ्या काळात येथून हवाई मालवाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी अधिका-यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

पोलिस अधीक्षकांच्या सूचना

विमानतळाची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक पंडित यांनी विमानतळावर कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रवाशांसह त्यांच्या साहित्याची तपासणी करताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत, अशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here