उंड्री येथे क्रिडांगण करण्याची ग्रामस्थांची मागणी

0
193

पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
उंड्री (ता. पन्हाळा येथे सुसज्ज क्रीडांगण (मैदान) उभारण्याची ठाम व व्यापक मागणी ग्रामस्थ, युवक-युवती व क्रिकेटप्रेमींनी एकमुखाने पुढे आणली आहे. गावात उपयोगी व सर्वसमावेशक मैदान उपलब्ध झाल्यास येथील युवकवर्ग तालुकास्तर, जिल्हास्तर तसेच राज्यपातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

ग्रामपंचायत कार्यालयामार्फत याबाबत मागणी सादर करण्यात आली असून, गायरान/इनाम जमीन/मुलकीपड जमीन/देवस्थान जमीन या सर्व उपलब्ध जमिनींचा सखोल सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध होईल, तेथे क्रीडांगण व मैदान विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी जागा उपलब्ध झाल्यास केवळ क्रिकेटच नव्हे तर विविध मैदानी खेळांना चालना मिळून आरोग्य, शिस्त, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती यांचा विकास होईल.

महत्त्वाचे म्हणजे, शासनाकडून अनेकदा क्रीडाविकासासाठी निधी मंजूर होतो, मात्र योग्य जागेअभावी तो निधी परत जाण्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण होते. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन “गाव तिथे क्रीडांगण” हे धोरण प्रत्येक ग्रामपंचायतीने राबवणे काळाची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

आजची पिढी योग्य संधी आणि पायाभूत सुविधा मिळाल्यास उद्या इतिहास घडवू शकते. त्यामुळे उंड्री गावासाठी क्रीडांगणाची जागा तत्काळ निश्चित करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी होत असून, ही मागणी मान्य झाल्यास गावाच्या क्रीडाक्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here