कोल्हापूरात “पॅराग्वे” या देशाचा “राष्ट्रवृक्ष ” म्हणून बहुमान” मिळालेला “पर्पल-पिंक ट्रम्पेट” वृक्ष आढळला. 

0
99

कोल्हापूर : विविध वृक्षांचा अभ्यास करताना वनस्पतीतज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर आणि वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना कोल्हापूरात “पॅराग्वे” या देशाचा “राष्ट्रवृक्ष ” म्हणून बहुमान” मिळालेला “पर्पल-पिंक ट्रम्पेट” वृक्ष आढळला.

कोल्हापूर जिल्हयाच्या वनस्पतीकोशात या वृक्षाची शास्त्रीय नोंद नव्हती. त्याची नोंद रितसर करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. बाचूळकर यांनी दिली.

आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात जांभळट-गुलाबी रंगाच्या फुलांनी बहरलेला, मध्यम उंचीचा, आकर्षक वृक्ष डॉ. बाचूळकर आणि वृक्षप्रेमी उरकुडे यांना आढळला.

डॉ. बाचूळकर यांनी हा वृक्ष पूर्वी कर्नाटकातील बेळगांव आणि बेंगळूर शहरातील बागांमध्ये पाहिला होता, यामुळे त्यांना याची ओळख लगेच पटली. संदर्भ ग्रंथ पाहिल्यानंतर संबंधित वृक्ष हा “पर्पल-पिंक ट्रम्पेट” असल्याचेच स्पष्ट झाले. डॉ. बाचूळकरांना हा वृक्ष यापूर्वी हातकणंगले तालुक्यातील रामलिंग रस्त्यावर असणाऱ्या भिडे फार्म हाऊसच्या बागेतही आढळला होता.

“टेटू” च्या कुळातील वृक्ष

पर्पल-पिंक ट्रम्पेट वृक्षाचे शास्त्रीय नाव “हॅन्ड्रोॲन्यस इम्पेटी जिनोसस्”असे असून, हा वृक्ष “बिस्तोनिमूसी” म्हणजेच, “टेटू” च्या कुळातील आहे. हा वृक्ष विदेशी असून, याचे मुळस्थान दक्षिण आणि उत्तर अमेरिका खंडात आहे. या खंडातील बहुतांश देशांत हे वृक्ष नैसर्गिकपणे वनक्षेत्रात आढळतात. या वृक्षाला पॅराग्वे देशाच्या राष्ट्रवृक्ष म्हणून बहुमान मिळाला आहे. या वृक्षांची अनेक देशांत बागांमध्ये लागवड केलेली आहे.

तुतारीच्या आकाराचे मुख

पर्पल-पिंक ट्रम्पेट हा पर्णझडी वृक्ष ८ ते १० मीटर उंच वाढतो. ते काहीवेळा २५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. फांद्या अनेक, पसरणाऱ्या असून, पाने संयुक्त हस्ताकृती आणि समोरासमोर असतात.

प्रत्येक पानांत पाच पर्णिका असून, त्या लंबगोलाकार असतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पानगळ होऊन डिसेंबर-जानेवारीत फुलांना बहार येतो. फुलांमध्ये पाच पाकळ्या एकमेकास चिकटलेल्या असून, तुतारीच्या आकाराची पुष्पनळी तयार होते. त्याचे मुख पिवळसर असते.

छाटकलम पध्दतीने या वृक्षाची रोपे तयार करता येतात. याला मराठीत नाव नाही, पण याला “जांभळट-गुलाबी तुतारी” म्हणू शकतो. –डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पती शास्त्रज्ञ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here