कांदा आणि टोमॅटोच्या किंमती या आठवड्यात घटल्याचे दिसून आले. सोयाबीनच्या किंमतीही हमीभावाच्या काठावर आहेत. तर तुरीच्या किंमती हमीभावापेक्षा जास्त असल्याचे या आठवड्याचे साप्ताहिक बाजार विश्लेषण आहे.
पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने ही माहिती दिली आहे.
सोयाबीनची साप्ताहिक स्थिती
मागील आठवड्यात (मकर संक्रांतीच्या आधीचा आठवडा) लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४७१० प्रती क्विटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकेमध्ये राष्ट्रीय पातळीवर ६२ टक्के वाढ झाली आहे.
सध्या लातूर बाजारातील किंमती या हमीभावा पेक्षा जास्त आहेत. मात्र इतर बाजारसमित्यांमध्ये हमीभावापेक्षा सोयाबीन कमी किंमतीला विकला जातोय.
दरम्यान USDA, WASDE अहवालानुसार (12 जानेवारी 2024), सन 2023-24 साठी अर्जेटिना, अमेरिका, चीन, रशिया, अमेरिका, चीन, रशिया, या देशातील उच्च उत्पादन अंदाजांमुळे जागतिक सोयाबीन उत्पादन 0.1 दशलक्ष टनांनी वाढून 399.0 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे. खरीप हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत रु. ४६०० प्रती क्विटल आहे.
कांदा बाजारभाव ५ टक्क्यांनी घटले
कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमत रु. १८२४ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ५ टक्केनी घट झाली आहे. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकेमध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टोमॅटो बाजारभाव २२ टक्क्यांनी उतरले
टोमॅटोच्या पुणे बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमत रु.१४१६ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत २२ टक्केनी घट झाली आहे. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवके मध्ये १०.२ टक्केनी घट झाली आहे.
तुरीची काय आहे स्थिती
गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन सुमारे 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या किमती किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत. तुरीसाठी मोफत आयात धोरण मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आले आहे. खरीप हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत रु. ७००० प्रति क्विं. आहे